• निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत इमल्यांची वेगाने उभारणी
  • प्रशासनाचे दुर्लक्ष

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून दिवा परिसराच्या विकासाच्या गप्पा सुरू झाल्या असतानाच, पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून या ठिकाणी बेकायदा बांधकामांचा रतीब सुरू आहे. बेकायदा बांधकामांमुळे बदनाम असलेल्या दिव्यातील भूमाफियांनी गेल्या काही दिवसांपासून आणखी वेगाने अनधिकृत इमारतींची उभारणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून आपली आर्थिक व मतांची गणिते जुळवण्यासाठी राजकीय नेतेमंडळीदेखील या बांधकामांना पाठीशी घालत आहेत.

दिव्यातील बेकायदा बांधकामांमध्ये स्थानिक माफियांचे मोठे अर्थकारण दडले आहे. या भागातील एक राजकीय पदाधिकारी त्यानेच उभारलेल्या बेकायदा इमारतींमधील भाडेकरू तसेच रहिवाशांच्या मतांवर कसाजिंकून येतो याचे किस्सेही येथे मोठय़ा चवीने चर्चिले जात असतात. बेकायदा बांधकामांमधील एकगठ्ठा मतपेटीवर राजकारणाचे मनसुबे रचणाऱ्या काही नेत्यांच्या समर्थकांनी आता जागा मिळेल त्या ठिकाणी इमारती उभारण्याचा सपाटा चालवला आहे.

अशी ठिकाणे निश्चित झाली की त्या रिकाम्या जागेत एक ते दीड दिवसात भराव टाकला जातो. त्यानंतर भराव टाकलेल्या ठिकाणी इमारतीचा पाया खणला जातो आणि जेमतेम १५ दिवसांच्या कालावधीत काही स्लॅबही उभारले जात असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दिवा येथील श्लोकनगर, विठ्ठलमंदिर पाठीमागील मुंब्रादेवी कॉलनी रोड, न्यू बालाजी हॉस्पिटलसमोर, भोई समाज हॉललगतच्या परिसरात तर वाढीव बांधकामे करण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत दिव्यातील खाडीकिनारीदेखील मोठय़ा प्रमाणात चाळींची उभारणी करण्यात आली आहे.

बेकायदा घरांचे दर वाढले

दिवा येथे रेल्वेच्या जलद गाडय़ांना थांबा दिल्याने येथील अनधिकृत घरांचे दरही वाढू लागले आहेत. पूर्वी या ठिकाणी १५००-१६०० रुपये प्रति चौरस फूट दराने घरे विकली जात होती. मात्र, हा दर आता २५०० ते तीन हजार रुपये प्रति चौ. फूट पोहोचला आहे. यासंबंधी दिवा परिसराचे महापालिका अधिकारी धनंजय गोसावी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘अशी बांधकामे सुरू आहेत याची कल्पना नाही. असे काही दिसल्यास लगेच कारवाई करू,’ असे ठोकळेबाज उत्तर दिले.

दिवा शहर नेहमीच समस्यांच्या कोंडीत अडकलेले आहे. या वर्षीच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ११ जागांसाठी दिव्यामध्ये विविध पक्षांमध्ये चुरस पाहावयास मिळत आहे. याच भागात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे हे राजकीय पक्षांना दिसत नाही का?

संतोष वेंगुर्लेकर, नागरिक

अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेतर्फे कडक नजर ठेवण्यात आली आहे.   दिवा शहरात अशी अनधिकृत बांधकामे सुरू असतील तर ताबडतोब कारवाई करण्यात येईल.

अशोक बुरपुल्ले, अतिक्रमण विभाग उपायुक्त, ठाणे महापालिका