scorecardresearch

कळव्यात खारफुटीवर भराव टाकून बेकायदा बांधकामे; मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कारवाईची मागणी!

. यामुळे ठाणे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

कळवा येथील खार जमिनीवरील खारफुटीवर भराव टाकून बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरू असून या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर केली आहे. यामुळे ठाणे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचबरोबर पालिकेचे अशा बांधकामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना काळात भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली. यावरून टीका होऊ लागल्यानंतर पालिकेने ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली होती. या करवाईमुळे बेकायदा बांधकामे उभारणीची कामे थांबल्याचे चित्र होते. परंतु पालिकेची मोहीम थंडावताच भूमाफियांनी पुन्हा बेकायदा बांधकामे सुरू केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे शहरभर दौरे करत आहेत. तरीही बेकायदा बांधकामे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असे असतानाच आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर बेकायदा बांधकामासंदर्भात टिप्पणी करत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

कळवा येथील खार जमिनीवरील खारफुटीवर भराव टाकून बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे सांगत आव्हाड यांनी त्यासंबंधीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “आधी ११० एकर आता कागदोपत्री ७२ एकर आणि नंतर उरेल ७ एकर” अशी टीकाही त्यांनी केली आहे. खारफुटी एका दिवसात गायब,असे सांगत पालिकेच्या कारभाराचे वाभाडे त्यांनी काढले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal constructions by filling in the blacks minister jitendra awhad demands action msr