scorecardresearch

ठाण्यातील सेवा रस्त्यांवर बेकायदा पार्किंग सुरूच

शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी केल्या जाणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती

ठाण्यातील सेवा रस्त्यांवर बेकायदा पार्किंग सुरूच
( संग्रहित छायचित्र )

शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी केल्या जाणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती मात्र, या करवाईचे फारसे अधिकार नसल्यामुळे वाहनचालक त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र असून रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण कोंडी होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचीही दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

ठाणे तसेच घोडबंदर भागातील महामार्गांवर वाहतूक कोंडी होत असून ही कोंडी टाळण्यासाठी नागरिक महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांचा वापर करीत आहेत. परंतु या रस्त्यावर बेकायदा उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. या दुहेरी कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कोंडीची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित सहायक आयुक्तांना सेवा रस्त्यावरील बेकायदा वाहने हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पालिका पथकाकडून अशी वाहने हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सेवा रस्त्यावरील बेकायदा होणाऱ्या पार्किंगला अद्याप आळा बसलेला नसल्याचे दिसून येते.

या मार्गांलगत गॅरेज, जुनी व नवीन वाहन खरेदी व विक्रीची दुकाने असून हे सर्वजण वाहने सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी करतात. या वाहनांची संख्याही जास्त असते. याशिवाय हॉटेल तसेच इतर आस्थापनाही सेवा रस्त्यांवर वाहने उभी करतात. सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजुला चारचाकी आणि दुचाकी उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतूकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहत नाही. या निमुळत्या मार्गामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. त्यामुळे महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी सेवा रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना बेकायदा वाहन पार्किंगचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. या वाहनांवर पालिकेने कारवाई सुरू केली असली तरी त्यांना कारवाईचे फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे वाहनचालक त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. मात्र, त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

ठाणे शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. पालिकेपेक्षा वाहतूक पोलिसांना या कारवाईचे अधिकार जास्त आहेत. हे दोन्ही विभाग वेगवेगळी कारवाई करीत असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम होत नाही. या दोन्ही विभागांनी एकत्रित कारवाई केल्यास त्याचा चांगला परिणाम होईल. त्यामुळे संयुक्तपणे कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.– संजय हेरवाडे ,अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या