ठाणे तसेच घोडबंदर परिसरातून जाणारा महामार्ग आणि लगतच्या सेवा रस्त्यांवर पुन्हा एकदा बेकायदा पार्किंग होऊ लागले आहे. काही वर्षांपूर्वी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी संयुक्त पथक तयार करून कारवाई केली होती. मात्र ही कारवाई मोहीम आता थंडावल्यामुळे सेवा रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत. आधीच मेट्रोच्या कामांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी असताना बेकायदा पार्किंगमुळे या कोंडीत भर पडत आहे.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. हे दोन्ही महामार्ग शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात. याशिवाय या मार्गावरून दुपार आणि रात्रीच्या वेळेत मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून या कामामुळे महामार्गावरील रस्ते काहीसे अरुंद झाले आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. असे असतानाच ठाणे आणि घोडंबदर भागातील महामार्गावर बेकायदा वाहने उभी केली जात असून त्यामध्ये बस, ट्रक आणि कारचा समावेश असतो. ही वाहने महामार्ग अडवीत असल्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.
महामार्गालगत हॉटेल, गॅरेज, विविध साहित्य विक्रीची दुकाने, मॉल आणि जुनी-नवीन वाहने विक्रीची दुकाने आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने सेवा रस्त्यांवर उभी केली जातात. याशिवाय, फ्लॉवर व्हॅली भागातील सेवा रस्ते आणि महामार्गावर जुनी वाहने विक्रीसाठी उभी केली जात असल्याचे दिसून येते. नितीन कंपनीजवळील सेवा रस्त्यांवर हॉटेल्स असून या ठिकाणी येणारे ग्राहक सेवा रस्त्यांवर वाहने उभी करतात. त्याचबरोबर नितीन कंपनी येथील महामार्गावर रस्त्याच्या एका बाजूला खासगी बसगाडय़ा उभ्या केल्या जात असल्याचे दिसून येते. तर घोडबंदर भागातील महामार्गावर खासगी बसगाडय़ा तसेच ट्रक बेकायदा उभे केले जातात. या बेकायदा पार्किंगमुळे महामार्गावर तसेच सेवा रस्त्यांवरील कोंडीत भर पडते.
ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांचे संयुक्त पथकामार्फत सध्या कारवाई केली जात नाही. महामार्ग, सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर ई-चलनाद्वारे वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. या कारवाईचा संदेश तात्काळ संबंधित वाहन मालकाला मोबाइलवर मिळत असून त्याला दंडात्मक रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे महामार्ग, सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के कमी झाले आहे.
– अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे वाहतूक शाखा