कल्याण पूर्व भागातील पाणीटंचाईवरून मागील काही वर्षांपासून तक्रारी सुरू आहेत. या भागाला मुबलक पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या पालिका प्रशासनाला अंधारात ठेवून कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी भागात एक तबेला चार इंची जलवाहिनीवरून चोरून पाणी वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
दुर्गाडी पुलाजवळील के.व्ही. ग्रुपतर्फे एकमजली तबेल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. या तबेल्याला पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरून चार इंची जलवाहिनी घेण्यात आली आहे. या वाहिनीला तबेले मालकांनी झडप बसवून घेतली आहे.
त्याच्या मनाला येईल तेव्हा ते ही झडप उघडझाप करून पालिकेच्या जलवाहिनीवरून चोरून पाणी वापरत आहेत, असे नगरसेवक समेळ यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. एकीकडे मागील चार वर्षांपासून मुबलक पाण्यासाठी ओरड करणाऱ्या  कल्याण पूर्व भागातील नगरसेवक, रहिवाशांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र, गोविंदवाडी भागात बेमालूमपणे पालिकेला अंधारात ठेवून चोरून पाणी वापरले जात आहे. महापौर कल्याणी पाटील यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून चोरीची जलवाहिनी तोडण्याचे आदेश दिले. तसेच बारावे येथेही चोरून पाणी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. तेथेही पाहणी करण्यास सांगण्यात आले. प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हे उद्योग तबेले मालक करीत असल्याच्या येथील काही नागरिकांनी नगरसेवकांकडे केलेल्या तक्रारीत सांगितले आहे.