दीड दिवसाच्या २७० गणेशमूर्तीचे विसर्जन

ठाणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कृत्रिम तलाव आणि खाडीलगतच्या विसर्जन घाटांवर गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने यंदा राबविलेल्या फिरत्या विसर्जन व्यवस्थेच्या उपक्रमाला २७० नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या कृत्रिम तलवांच्या संकल्पनेपाठोपाठ पर्यावरणपूरक फिरत्या विसर्जन व्यवस्थेलाही नागरिकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आला असून शहरातील रुग्णसंख्या पाचशेवरून दीडशे ते दोनशेवर आली आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी गणेशोत्सवाच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत होती. गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान कृत्रिम तलाव आणि विसर्जन घाटांवर नागरिकांची गर्दी होऊन करोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी विसर्जन घाटांवरील गर्दी टाळण्यासाठी फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टेम्पो आणि जीपमध्ये मोठय़ा पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून त्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी ही वाहने शहरातील विविध परिसरात फिरत होती. या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेला २७० नागरिकांनी प्रतिसाद देऊन त्यात गणेशमूर्तीचे विसर्जन केले.

कृत्रिम तलावांमध्ये ७७४० गणेशमूर्तीचे विसर्जन

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १२३ सार्वजनिक तर १६ हजार ५४४ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले असून त्यापैकी शहरातील कृत्रिम तलावांमध्ये ७७४० तर फिरत्या विसर्जन व्यवस्थेत २७० गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. उर्वरित मूर्तीचे गृहसंकुलांच्या आवारात व घरातच विसर्जन करण्यात आले.

फिरत्या विसर्जन व्यवस्थेच्या उपक्रमामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईलच, पण त्याचबरोबर विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गर्दी टळून करोनाचा धोका कमी करणे शक्य होणार आहे. या नवीन संकल्पनेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

– संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका