scorecardresearch

डोंबिवलीत देसले पाड्यातील तरुणांकडून वाहन चालकाला बेदम मारहाण

रविवारी संध्याकाळी मानपाडा रस्त्यावर स्टार काॅलनी येथे बडोदा बँकेसमोर हा प्रकार घडला.

डोंबिवलीत देसले पाड्यातील तरुणांकडून वाहन चालकाला बेदम मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र

शीळ ते डोंबिवली दरम्यान मोटारीतून प्रवासी वाहतूक करुन उपजीविका करणाऱ्या देसई गावातील एका वाहन चालकाला डोंबिवली जवळील नांदिवली देसले पाड्यातील दोन तरुणांनी लाथाबुक्की, काठीने बेदम मारहाण केली आहे. रविवारी संध्याकाळी मानपाडा रस्त्यावर स्टार काॅलनी येथे बडोदा बँकेसमोर हा प्रकार घडला.

हेही वाचा >>>ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट ?

जितू रमेश निशाद (४८, रा. साई एनक्लेव्ह, नांदिवली, देसलेपाडा), राम फुलचंद कनोजिया (४१, रा. अमर म्हात्रे चाळ, मयुरेश्वर मंदिरा जवळ, नांदिवली देसलेपाडा, डोंबिवली) अशी आरोपी तरुणांची नावे आहेत.विवेक राम पाटील (३२, रा. देसई गाव) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. विवेक पाटील हे रविवारी संध्याकाळी शिळफाटा भागातून आपल्या काळी पिवळी इको कारमधून प्रवासी घेऊन डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. स्टार काॅलनी येथून जात असताना आरोपी जितू, राम हे दोघे रस्ता ओलांडत होते. विवेक यांनी आपल्या वाहनाची गती कमी करुन दोघांना जाऊ दिले. त्यावेळी जितू, राम यांनी विवेककडे रागाने पाहत ‘आम्ही रस्ता ओलांडत आहोत, हे तुला दिसत नाही का. आम्ही या भागाचे दादा, भाई आहोत. हे तुला कळत नाही का,’ असे बोलत असताना दोघांनी विवेकच्या मोटारीला रागाने लाथ मारली. लाथ का मारली म्हणून विवेकने प्रश्न करताच दोघांनी बाजुला उभ्या असलेल्या मोटारीतून एक लाकडी दांडका आणून तो विवेकच्या मोटारीवर मारला. वाहनाच्या काचा फुटून त्या अंगावर उडतील व जितू, राम आपणास आता मारहाण करतील असा विचार करुन विवेक यांनी मोटारीतून उडी मारुन पळ काढला. मोटारीतील प्रवाशांनी घाबरुन उड्या मारल्या. चालक विवेक पळू लागताच आरोपींनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडून त्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली. पुन्हा या भागात दिसला तर मारण्याची धमकी जितू, राम यांनी चालक विवेक पाटील यांना दिली आहे.

हेही वाचा >>>ठाणे : सात तासानंतर वाहतूक कोंडी सुटली

जितू, रामच्या या दहशतीने पादचारी हैराण झाले होते. या तरुणांना पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असे प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बेकायदा चाळी, इमारतींमधून मिळालेल्या पैशातून अनेक बेरोजगार तरुण आता स्वताला दादा, भाई समजून दहशतीचे वातावरण आपल्या भागात निर्माण करत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात वाढत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 15:56 IST

संबंधित बातम्या