ठाणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राजकीय समीकरणे बदललेल्या ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसह जनता लोकसभा निवडणुकीत शिंदे की ठाकरे यापैकी नेमकी कुणाच्या बाजुने कौल देते याकडे सर्वांच लक्ष लागले असून ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामुळे जनतेचा कौल मिळविण्यासाठी शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, शनिवारी सकाळी ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघावर लक्ष केंद्रीत करत येथूनच शनिवारी राजन विचारे यांच्या प्रचारयात्रेला सुरुवात केली. शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रभागातूनही यात्रा नेण्यात आली. या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

ठाणे लोकसभा मतदार संघातून उबाठा गटाने खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिंदेच्या शिवसेनेने माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. म्हस्के यांच्या उमेदवारीवरून नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु या मतदार संघातील निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची मानली जात असून यामुळे म्हस्के यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: मैदानात उतरत गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचा सपाटा लावला आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मतदार संघात प्रचार यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी-पाचपखाडी मतदार संघावर लक्ष केंद्रीत करत तेथूच यात्रेला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : कल्याण लोकसभा क्षेत्रात उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रेंचा शिंदेच्या सेनेत प्रवेश

कोपरी-पाचपखाडी विधानसभा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर याच मतदार संघातील आनंदनगर भागाचे प्रतिनिधित्व शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के करतात. त्यामुळे ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदे आणि त्याचबरोबर म्हस्के यांच्या मतदार संघातून यात्रा काढून त्यांना एकप्रकारे शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. यात्रेची सुरुवात ठाणे पूर्वेच्या नारायण कोळी चौकातून झाली. अष्टविनायक चौक, कोपरी गाव, नाखवा हायस्कूल, दौलत नगर, धोबी घाट, कोपरी गाव, आनंद नगर, गांधीनगर, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय, वागळे नाका, डिसोजा वाडी, पंचपरमेश्वर मंदिर, रोड नंबर १६, किसन नगर १,२, ३, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, आयटीआय नाका, रामनगर या प्रभागातून विचारे यांची प्रचारयात्रा नेण्यात आली. शिंदे गटाची या भागात ताकद आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे व ठाकरे गटात या भागात वादाचे प्रसंग उद्भवले होते. त्यामुळे विचारे यांच्या प्रचार रॅलीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. पुढे रामनगर येथून टीएमटी डेपो, साठेनगर, जय भवानी नगर, इंदिरानगर, लोकमान्य नगर डेपो, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, आई माता मंदिर, अंबिका नगर, रामचंद्र नगर, वैतीवाडी, काजूवाडी, लुईसवाडी, हाजुरी, रघुनाथ नगर येथे या रॅलीचा समारोप झाला.