लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम अद्याप अपूर्ण असून त्यावर छप्परासह विविध कामे सुरू आहेत. असे असतानाही लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या होम प्लॅटफॉर्म उद्घाटनाचा घाट सत्ताधारी पक्षाच्या वतीने घातला जातो आहे. लोकसत्ता ठाणे मधून याबाबत सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या वतीने या उद्घाटनाला विरोध केला जातो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांनी या उद्घाटनाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे.

बदलापूर रेल्वे स्थानक गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. स्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढते आहे. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होते आहे. मात्र स्थानकात प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात रेल्वे प्रशासनाला यश येताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी कमी उपयोगाच्या फलाट क्रमांक तीनवर स्वयंचलित जिना बसवण्यात आला. त्यानंतर होम प्लॅटफॉर्म उभारणीला मंजुरी मिळाली. मात्र निवडणुकीत आपल्या खात्यात एका कामाचा शुभारंभ दाखवण्याचा प्रयत्नात २०१९ लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी घाईघाईत होम प्लॅटफॉर्म भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर पाच वर्षांनंतरही बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्म पूर्ण होऊ शकलेला नाही. पाच वर्षांनंतरही या होम प्लॅटफॉर्म वरील छप्पर, विद्युत व्यवस्था यासह इतर कामे प्रलंबित आहेत.

आणखी वाचा-गोएंका शाळेसमोर पालकांचा नऊ तास ठिय्या

फलाट क्रमांक एकवर सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पूर्णत्वापूर्वीच होम प्लॅटफॉर्म वापरासाठी खुला केला. येथे अजूनही पुरेसे छप्पर नसल्याने भर उन्हातच उभे राहत चटके सोसत प्रवाशांना लोकल पकडावी लागते आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम ऑक्टोबर २०२३ अखेरीस पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र फेब्रुवारी महिना संपत आला तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यात आता स्थानिक खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या होम प्लॅटफॉर्मचे उद्घाटन २४, फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयातर्फे देण्यात आली होती. त्यासाठी तशी तयारीही सुरू करण्यात आली आहे. मात्र काम अपूर्ण असताना श्रेय मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रकार केला जात असल्याचा आरोप करत शहरातील विविध विरोधी पक्षांनी या उद्घाटनाला विरोध केला आहे.

आणखी वाचा-विद्यार्थी विनयभंग प्रकरण : भाजपचे पदाधिकारी गोएंका शाळेत शिरताच पालकांचा विरोध

काँग्रेसचे बदलापूर ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव यांनी या उद्घाटनाला विरोध केला जाईल, असा इशारा देत तसे पत्र स्थानक व्यवस्थापकांना दिले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) वतीने या उद्घाटनाला विरोध करण्यात आला आहे. हा निव्वळ लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाचे शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या २४ फेब्रुवारी रोजी या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील विरुद्ध महा विकास आघाडी असा सामना रंगताना दिसतो आहे.