|| भगवान मंडलिक

गुंतवणुकीची रक्कम धनादेशाद्वारे परत करण्यास नकार; बचत खाते उघडून त्यात पैसे वळते करण्याची शक्कल

चांगला परतावा मिळत असल्याने टपाल खात्याच्या विविध योजनांत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना आता ही गुंतवणूक काढून घेणे कठीण बनले आहे. मुदत समाप्तीनंतर अथवा अचानक उद्भवलेल्या गरजेनुसार गुंतवणूक काढू इच्छिणाऱ्यांना धनादेशाद्वारे परतावा देणे टपाल कार्यालयाने बंद केले आहे. त्याऐवजी ग्राहकांना टपाल कार्यालयात बचत खाते सुरू करण्याची सक्ती केली जात आहे.

विशेष म्हणजे, गुंतवणुकीचा परतावा या खात्यात वळता झाल्यानंतर ती संपूर्ण रक्कम ग्राहकाला काढता येते. त्यामुळे एकदाच संपूर्ण रक्कम काढल्यानंतर हे खाते ‘मृत’ बनते. अशा वेळी बचत खात्याची सक्ती कशासाठी, असा सवाल गुंतवणूकदार विचारत आहेत.

टपाल कार्यालयातील आवर्त ठेव, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अशा विविध योजनांमध्ये सर्वसामान्य नागरिक गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीच्या सुरक्षेची हमी आणि जास्त परतावा यामुळे या गुंतवणुकीकडे नागरिकांचा ओघ असतो. पूर्वी अशा गुंतवणुकीची मुदत संपली की टपाल कार्यालयातूनच ग्राहकाला दोन-तीन दिवसांत धनादेश मिळत असे. मात्र, ही पद्धत गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात बचत खाते उघडावे लागत आहे. त्यासाठी अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे जोडणे, ग्राहक ओळख सिद्ध करणे अशा नाना प्रक्रिया त्यांना पार पाडाव्या लागतात. यात वेळ आणि श्रम खर्च होत असल्याने गुंतवणूकदार नाराज आहेत.

एकीकडे, केंद्र सरकार डिजिटल तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देत असताना टपाल खात्याचा कारभार अजूनही ‘ऑफलाइन’ सुरू आहे. गुंतवणुकीची रक्कम काढण्यापासून बचत खात्यात ती वळती करेपर्यंत सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात रांग लावावी लागते. धनादेश देणे शक्य नसेल तर टपाल कार्यालयाने ग्राहकांच्या विद्यमान बँक खात्यात रक्कम ऑनलाइन हस्तांतर केली तरी हरकत नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

‘वरिष्ठ पातळीवरील निर्णय’

धनादेश देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय वरिष्ठ टपाल व्यवस्थापनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी स्थानिक टपाल कार्यालये करीत आहेत. टपाल कार्यालयातील गुंतवणुकीची मुदत संपली असेल तर यापुर्वीची धनादेश देण्याचे बंद करून गुंतवणूकादाराला ती गुंतवणूक काढून घेण्यासाठी टपाल कार्यालयात बचत खाते उघडावे लागते. खाते उघडल्यानंतर मुदत संपलेल्या गुंतवणुकीची रक्कम त्या बचत खात्यात दोन ते तीन दिवसांत जमा होते, अशी माहिती टपाल विभागाच्या ठाणे वरिष्ठ अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

बचत खात्यांचा फुगवटा?

गुंतवणुकीची रक्कम काढण्यासाठी ग्राहकांवर बचत खाते उघडण्याची सक्ती केली जाते. एकदा ग्राहकाने बचत खाते उघडले की त्यातून तो आपली पूर्ण रक्कम एकाच वेळी काढून घेऊ शकतो. बहुतांश ग्राहक हाच मार्ग निवडतात. त्यामुळे त्यांची टपाल कार्यालयातील बचत खाती केवळ नावापुरती उरतात. अशा वेळी बचत खात्यांची संख्या वाढल्याचे दाखवण्यासाठी ही सक्ती केली जात असल्याची टीका होत आहे.