कोणत्याही खाद्यपदार्थाची वार्ता आधी त्याच्या गंधाने खवैयांच्या मनात भरते. खाद्यपदार्थाच्या दुनियेत अशा स्वाद आणि गंधांनी ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाची संस्कृती मोठी आहे. खाऊ गल्लीमध्येही अशाच पदार्थाना अधिक मागणी असते. अशाच पदार्थामध्ये समावेश होतो तो कोल्हापूरच्या आप्पे या पदार्थाचा. तांबडय़ा-पांढऱ्या झणझणीत रश्शासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये सर्वसाधारणपणे गोड असलेल्या आप्प्यांनाही तिखट अवतार दिला आहे. मात्र तरीही त्याची चव जिभेला पाणी आणल्यावाचून राहत नाही. कोल्हापूरचे हेच आप्पे आता ठाण्यातही उपलब्ध झाले आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गुरुकृपा स्नॅक्स कॉर्नरमध्ये सकाळी कोल्हापूरचे आप्पे मिळतात. ठाण्यातील वैशाली सुतार आणि सागर सुतार या दाम्पत्याचे हे तिखट आप्पे अस्सल खवैयांच्या पसंतीस उतरले आहेत. सुतार कुटुंब मूळचे कोल्हापूरचे. कॅटरिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या गावाकडचा हा पदार्थ तयार करून विकण्याचा निर्णय घेतला. अस्सल खवैये आपण खाल्लेल्या विशेष डिशची इतरांनाही शिफारस करीत असतात. त्यातूनच कोल्हापूरच्या या आप्पेंची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. अर्थात हे आप्पे बनविण्यासाठी त्यांना बरीच मेहनत करावी लागते. दररोज संध्याकाळी तांदूळ, उडदाची डाळ धुऊन, भिजवून, बारीक करून त्याचे पीठ तयार करावे लागते. त्यामध्ये प्रमाणात पाणी घालून ते एकजीव करून रात्रभर ठेवले जाते. त्यामध्ये ताजी हिरवीगार मिरची, कोथिंबीर त्याचबरोबर जिऱ्याचा मसाला पिठात मिसळला जातो. त्याचबरोबर खास ताज्या नारळाची चटणी केली जाते. आप्पे जसे खायला छान वाटतात, तसेच त्याची कृतीही बघण्यासारखी असते. विशिष्ट प्रकारच्या भांडय़ांमध्ये आप्पे तयार केले जातात. त्यात तव्यासारख्या पसरट भांडय़ात बारीक वाटय़ांचे साचे असतात. ज्यात हे पीठ टाकले जाते. त्यानंतर हे आप्पे मोदकासारखे वाफवले जातात. त्यानंतर त्याच्यावर तेलाची धार सोडली जाते. आप्पे शिजून थोडे लालसर झाले की लाकडी कलित्याने त्यावर लोणी शिंपडले जाते. अशा रीतीने कुरकुरीत, लुसलुशीत आप्पे तयार होतात.
सकाळी येथे अनेक खवैये आप्प्यांवर ताव मारताना दिसतात. दररोज येथे हजार ते बाराशे आप्पे बनवले जातात. लवकरच शिमला आप्पे, ओनियन आप्पे तसेच मेथी आप्पे खवैयांसाठी पेश केले जाणार आहेत. तसेच खवैयांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता लवकरच अन्य ठिकाणी दुकान सुरू करण्याचा मनोदय सुतार दाम्पत्याने व्यक्त केला आहे.
कोल्हापुरी आप्पे- गुरुकृपा स्नॅक्स कॉर्नर, स्टेशन रोड, ठाणे (प).
वेळ सकाळी- १० ते १२
– सौरव आंबवणे