वसई अर्नाळा फार प्राचीन क्षेत्र! थेट पांडवकालापासून या क्षेत्राचा उल्लेख सापडतो. सांदिपनी ऋषींचा आश्रम असो वा परशुरामांची तपोभूमी, बौद्धकालीन स्तूप असो, वा शूर्पारक बंदर.. या अशा अनेक विभूतींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. अनेक राजवटी इथे नांदल्या आणि काळाच्या उदरात लोपदेखील पावल्या. या बेटाचे महत्त्व ओळखून परकीय सत्तांनी व्यापाराच्या दृष्टीने या भागाचे महत्त्व ओळखले आणि स्थानिकांवर शासनही केले. अन्यायाची परिसीमा झाली तेव्हा त्याचे निर्दालन करायला या भूमीचे सुपुत्र सरसावले. परकीयांच्या जोखडातून त्यांनी या भूमीला मुक्त केले. त्यांच्या या पराक्रमाची गाथा, शौर्य, मुत्सद्देगिरी, दूरदृष्टी, नेतृत्वकौशल्य आणि संघभावना अशा अनेक बोलक्या खुणाचे प्रतीक म्हणजे अर्नाळ्याचा हा किल्ला. काळाच्या ओघात बखरी आणि ऐतिहासिक पत्रव्यवहारातून इतिहासाच्या या पाऊलखुणा नष्ट झाल्या खऱ्या; परंतु काळाला टक्कर देत शतकानुशतके ताठ उभ्या असलेल्या इतिहासाच्या या मूक साक्षीदारांच्या उदरात आजही अनेक रहस्ये साठवून ठेवलेली आहेत.

समुद्राच्या लाटांचे आक्रमण आणि देह खिळखिळा करू पाहणाऱ्या दमट हवेशी दोन हात करत भक्कमपणे पाय रोवून उभी असलेली वास्तू म्हणजे जंजिरे अर्नाळाचा किल्ला! चहुबाजूंनी पाण्याने वेढलेल्या या बेटाकडे त्या काळी कोणाचे फारसे कधी लक्ष गेले नव्हते. त्या काळी व्यापाराच्या अनुषंगाने भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी या ठिकाणी फक्त एक टेहळणी बुरुज बांधला होता; परंतु पोर्तुगीज गेल्यावर मात्र या बेटाचे व्यापारी आणि राजकीयदृष्टय़ा महत्त्व अधिक वाढले. कारण समुद्राला मिळणाऱ्या वैतरणा नदीमुळे समुद्र आणि नदी अशी दोन्ही मार्गे होणारा व्यापार लक्षात घेता महसूल मिळवण्यासाठी मराठय़ांनी जंजिरा हा किल्ला बांधला. किल्ल्याच्या उत्तराभिमुख असलेल्या प्रमुख प्रवेशद्वारावर बाजीराव अमात्य यांच्या आज्ञेवरून या किल्ल्याचं बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख असणारा शिलालेख आजही आढळतो. याशिवाय प्रवेशद्वारावर शरभ अथवा व्याल अशा अनेक प्राण्यांच्या रूपवैशिष्टय़ांपासून बनलेल्या प्राण्याचे तसेच विजयमाला धारण केलेल्या गजांचे सुस्थितीतील शिल्प आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर गोल घुमट आढळतो. बुरुजाखाली सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी कक्ष आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरुजांवर केलेली वैशिष्टय़पूर्ण रचना बघण्यासारखी आहे. किल्ल्याच्या विविध दिशांना असलेले नऊ  बुरूज परिसराचे चौफेर दर्शन घडवतात. किल्ल्याबाहेर मराठय़ांनी बनवलेली मराठी धाटणीची एक तोफ अजूनही आहे. कालिकामातेच्या मंदिरासोबतच किल्ल्यात शंकराचे आणि दत्ताचे मंदिर असून एक दर्गादेखील आहे. अखेरच्या दीडशे सैनिकांसह उपाशीपोटी किल्ला लढवत ठेवणाऱ्या एकनिष्ठ बेलोसे यांची वीरगळदेखील येणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. किल्ल्यापासून अंदाजे पाऊण तासावर पोर्तुगीजांनी बांधलेला बुरूज आहे. तिथे मूळ अर्नाळा किल्ल्यावरची वेताळ मूर्ती स्थलांतरित केलेली आहे. किल्ल्यात पिण्याच्या पाणी साठवण्याची व्यवस्था आणि गोड पाण्यांच्या विहिरीसुद्धा आहेत.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
what is ring of fire
यूपीएससी सूत्र : भूकंपप्रवण क्षेत्र असलेले ‘रिंग ऑफ फायर’ अन् कचाथीवू बेटाचा वादग्रस्त इतिहास, वाचा सविस्तर…
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]

मराठी इतिहासाचा मानबिंदू असलेला हा किल्ला आज उपेक्षेचा धनी आहे. इथे येण्यासाठी संसाधनांचा अभाव आहे. भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन मच्छीमारांच्या होडय़ांमधूनच या ठिकाणी यावे लागते. किल्ल्याच्या प्रवेशद्वरावर तरंगणाऱ्या किंवा कायमस्वरूपी जेट्टी नसल्याने प्रवेश करतानाच अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या शिवाय किल्ल्याकडे जाणारी वाटदेखील अस्वच्छ आहे. या ठिकाणी येणाऱ्यांसाठी खाण्या-पिण्याची कसलीही व्यवस्था नाही. त्यामुळे उत्तम पर्यटन स्थळ होण्याच्या अनुषंगाने या भागाचा विकास होणे ही काळाची गरज आहे. पण प्रशासनाकडून त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होत नाहीत, हीच या ऐतिहासिक वास्तूबाबतची शोकांतिका आहे. थरारक सागरी सफरीचा आनंद लुटून इथे येणे, किल्ल्याचा फेरफटका मारणे, ही पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल पण त्या अनुशंगाने या भागाचा विकास करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या ठिकाणा साहसी सागरखेळाना वाव आहे का? ही शक्यताही आजमावण्यासारखी आहे; परंतु हे होण्याअगोदर निदान या गौरवशाली इतिहासाच्या वारशांचे जतन, देखभाल, स्वच्छता आणि संरक्षण व्हायलाच हवे याबद्दल कोणाचेही दुमत नसेल.

दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा

खरे तर १९०९ साली हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्थान म्हणून घोषित केला आहे; परंतु तशा आशयाचा कोणताही फलक या ठिकाणी आढळत नाही. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुजांचा वापर मासळी सुकविण्यासाठी सर्रासपणे केला जातो. किल्ल्याच्या रक्षणासाठी प्राण वेचणाऱ्यांनी आपल्या पराक्रमातून आपल्या कार्याचा उल्लेख अजरामर केला आहे, पण किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांनी मात्र त्यांची जाणीव न ठेवता जागोजागी स्वत:ची नावे रेखाटल्याने या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व अजूनही त्यांना उमगले नाही, याचीच प्रचीती येते.

किल्ला संवर्धनासाठी गिरिप्रेमींची धडपड

या किल्ल्याला दोनशेऐंशी वर्षे पूर्ण झाली. वसईतील ज्वलंत गिरिप्रेमी श्रीदत्त राऊत या तरुणाच्या नेतृत्वाखाली काही इतिहासप्रेमी तरुणांनी किल्ल्याची स्वच्छता करून सरकारच्या विस्मरणात गेलेल्या आपल्या तेजस्वी पूर्वजांना मानवंदना दिली. किल्ल्याची सफर घडवत त्याच्या स्थापत्यशास्त्रातले अनेक पैलू उलगडले आणि किल्ल्याचा गौरवशाली इतिहास जिवंत केला.

कसे जाल? : वसई, विरार, नालासोपारा स्थानकांमधून बसने अर्नाळा डेपोपर्यंत यावे. डाव्या फाटय़ाने किनाऱ्यापर्यंत आल्यावर स्थानिक मच्छीमारांच्या बोटीतून भरती-ओहोटीची आगाऊ  चौकशी करून अर्नाळा बेटावर जाता येते. पाणी, उन्हाची टोपी जवळ बाळगणे अत्यावश्यक आहे.

[jwplayer 9JEmT8GZ-1o30kmL6]