दोन लाख रुपये भरपाई देण्याचा ग्राहक मंचचा आदेश
आरोग्य विमा काढूनही उपचारांचा खर्च न देणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीस सहा टक्के व्याजाने दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.
ठाण्यात राहणाऱ्या श्रद्धा नागपुरे यांचे पती संजीव यांना १३ फेब्रुवारी २००७ रोजी त्यांनी काढलेल्या पॉलिसी अंतर्गत २ लाख रकमेचे संरक्षण होते. या पॉलिसीच्या वैधतेदरम्यानच संजीव यांना उलटय़ा व अन्य त्रास होऊ लागल्याने त्यांना वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र ६ जून २००८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर श्रद्धा यांनी उपाचारासाठी आलेल्या खर्चाचा दावा आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनीला केला. परंतु तक्रारदारांच्या पतीला झालेला आजार हा पॉलिसीपूर्व असल्याने तसेच पॉलिसीच्या नियमानुसार पॉलिसीपूर्व रोगावर केलेल्या उपचाराचा खर्च देय होत नसल्याचे सांगून त्यांचा हा दावा नाकारण्यात आला. त्याविरुद्ध श्रद्धा यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली.
यासंदर्भात विमा कंपनीला तक्रार धारकास पॉलिसी घेण्यापूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास होता व त्यावर ते औषधोपचार घेत असल्याचा सबळ पुरावा देता आला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती ना. द. कदम यांनी विमा कंपनीस ६ टक्के व्याजासह भरपाई तसेच त्रासापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले.