आगरी समाजातील लग्नसमारंभ तसेच अन्य कौटुंबिक कार्यक्रमांवर होणारा अनाठायी खर्च टाळण्यासाठी या समाजातील विविध संघटना तसेच जाणकार नेते आवाहन करत असले तरी परिस्थिती फारशी बदललेली नाही. लग्न, मुंज, हळदी, वास्तुशांती अशा समारंभांसोबतच आता वाढदिवस सोहळय़ांनाही सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूप देण्यात येत आहेत. त्यातच दिव्यामध्ये एका कुटुंबाने आपल्या मुलाचा ‘प्रथम दाढी’ समारंभ घडवून आणत सोहळय़ांच्या जंत्रीत आणखी एक भर पाडली आहे. अशा सोहळय़ांतून कौटुंबिक स्नेहमीलन आणि आनंद मिळत असला तरी त्यावर होणारा खर्च हे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन असल्याची टीकाही होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाळाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम सर्वाना माहीत आहे. मात्र मुलगा वयात आल्यानंतर त्याचा ‘प्रथम दाढी’ समारंभ मोठय़ा थाटामाटात साजरा होणे ही प्रथा प्रथमच दिवा येथे पाहावयास मिळाली. विशेष म्हणजे, या सोहळय़ासाठी रीतसर पत्रिका छापण्यात आल्याच; पण या सोहळय़ाच्या निमंत्रणाचे जाहीर फलकही शहरात काही ठिकाणी लावण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे, शुक्रवारी २२ मे रोजी हा सोहळा धूमधडाक्यात पार पडला. या संदर्भात प्रयत्न करूनही संबंधित कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही.
वाढदिवसालाही अमाप खर्च करून साजरा करण्याची राजकीय पद्धत आता सर्वत्र रूढ होऊ लागली आहे. निळजे गावचे माजी सरपंच सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नर्तिकेवर पैशांची उधळण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते.
पैशांची ही अनाठायी होणारी उधळपट्टी योग्य नाही, हे दाखविण्यासाठी काही युवक संघटनांनी एक दिवसात लग्न सोहळा, दारुविना हळदी केलेल्या कुटुंबाचा सत्कार, नाममात्र दरात सभागृह उपलब्ध असे वेगवेगळे उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण केला आहे. ‘दाढी वा वाढदिवस मोठय़ा प्रमाणात साजरे करणे उचित नाही. हे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘आगरी यूथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invitation for shaving ceremony
First published on: 27-05-2015 at 01:33 IST