ठाणे : महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने व्हावेत, यासाठी बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी तयार करण्यात आली असतानाच, या क्रीडा प्रेक्षागृहात आयपीएलचे सामने होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिले. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी नव्हती. यामुळे येथे रणजी तसेच इतर क्रीकेट सामने होत नसल्याने क्रीडा प्रेक्षागृहाची पांढरा हत्ती अशी ओळख निर्माण झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने बीसीसीआयच्या नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे. नव्या खेळपट्टीमुळे २५ वर्षांनंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने मैदानात पार पडले. त्यापाठोपाठ याच मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडूनी सराव केला होता. हेही वाचा >>> किसननगरप्रमाणेच लोकमान्यनगरचाही क्लस्टरच्या माध्यमातून विकास करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही नव्या खेळपट्टीमुळे मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळविणे शक्य झाले असले तरी त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलचे सामने खेळविण्याकरिता मैदानात अत्याधुनिक विद्युत दिव्याची व्यवस्था असणे गरजेचे असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे पालिकेकडून मैदानात तशी विद्युत व्यवस्था उभारणीचे काम सुरु केले आहे. असे असतानाच, या क्रीडा प्रेक्षागृहात आयपीएलचे सामने होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यातील प्लॅनेट हॉलिवूड या पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिले. आयपीलसाठी सराव करायला खेळाडू ठाण्यात यायचे पण, मुक्कामाला मात्र मुंबई गाठायचे. कारण ठाण्यात एकही पंचतारांकित हॉटेल नव्हते. आता प्लॅनेट हॉलिवूड हे पहिले पंचतारांकित हॉटेल ठाण्यात सुरू झाले आहे, पंचतारांकित हॉटेल उपलब्ध झाल्याने भविष्यात आयपीएल सामनेही ठाण्यात रंगतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.