अंतर्वस्त्र निर्मिती क्षेत्रातील ‘व्हीआयपी’ उद्योग संस्थेचे संस्थापक जयकुमार पाठारे यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कपिल, सुनील हे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
काही वर्षांपूर्वी जयकुमार पाठारे यांच्या हृदयावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. १९५९ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कोल्हापूर विभागात अभियांत्रिकी शाखेत ते कार्यरत होते. तेथून ते बदली होऊन कल्याण येथे आले. नोकरी करीत असताना वाईट अनुभव आल्याने त्यांनी ‘मराविम’ मंडळातील नोकरीचा राजीनामा दिला. अंबरनाथ येथील टॅक कंपनीत त्यांनी काही काळ नोकरी केली. नोकरीत मन रमत नसल्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती. काही काळ त्यांनी ‘मरावि’मंडळात ठेकेदार म्हणून काम केले. जुना सहकारी जयपाल रेड्डी यांच्या सहकार्याने पाठारे यांनी मॅक्सवेल इलेक्ट्रिकल कंपनीची स्थापना केली. एखादी ग्राहकोपयोगी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी ‘व्हीआयपी’ मोजे व अंतर्वस्त्र तयार करणारी कंपनी स्थापन केली. अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संस्थांमध्ये पाठारे यांचे कार्य सुरू होते. कल्याणमधील गायन समाज, लायन्स, रोटरी क्लबमध्ये ते सक्रिय होते. कल्याणमधील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
रिक्षा उलटून एकाचा मृत्यू
पालघर : डहाणू तालुक्यातील डहाणू-चिंचणी रस्त्यावरील बहाड गावाजवळ डहाणूकडे जाणारी भरधाव सहा आसनी रिक्षा उलटून एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत.
शाहरूख शेख (वय १९) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह डहाणू येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तारापूर येथून डहाणूकडे जात असताना या रिक्षाला अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे.