Jitendra Awhad : राज्यातील अनेक महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी म्हणजे आज शहरात मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असून, विरोधी पक्षातील नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. या आदेशाविरोधात काही ठिकाणी तर मांसहारी जेवणाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड कल्याणमधील एका हॉटेलमध्ये मांसहारी जेवण करणार आहेत, त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी सरकार आणि कल्याण महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला.
सध्याचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर चाललं आहे
सध्याचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवर चाललं आहे. शिवाय जे काही सांगितलं जातं आहे की शासन निर्णय आहे तो फक्त सल्ला आहे. कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत मान्य आहे. पण मांस विक्रीवर बंदी का? १५ ऑगस्टच्या दिवशी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन पोलीस बसत असतील तर काय अर्थ आहे? आमचे कार्यकर्ते काय अतिरेकी आहेत का? मांसविक्री बाबत शासनाने सल्ला दिला आहे. जीआर वगैरे काहीही काढलेला नाही. शासनाच्या सल्ल्यानुसार असा शब्द आहे. त्यात आदेश वगैरे काहीही म्हटलेलं नाही. सुट्टीचा दिवस आहे लोक जेवायला जातील त्यांना मटण वगैरे काही नको का? महागाई आधी इतकी वाढली की काय सांगावं. आधी एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता १०० ग्रॅम मटणात १ किलो बटाटा असतो. आता वासावरतीच जेवण करावं लागतं चला मटणाचं जेवण आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
आपला देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे-आव्हाड
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, आपला देश हुकूमशाहीकडेच चालला आहे. ईव्हीएम मध्ये घोटाळा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच त्यामुळे बदलला. आधी व्होट चोरी होती आता ईव्हीएममध्ये चोऱ्या होत आहेत. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी पाहिलं पाहिजे असंही आव्हाड म्हणाले. आमचं हेच म्हणणं आहे. ही जोर जबरदस्ती कशासाठी? स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहेना? मग तुम्ही मांसाहाराविरोधात शाकाहाराची लढाई का लावत आहात? सध्या फक्त लढाई लावण्याचे कामं सुरू आहे. जाती-जातीमध्ये, धर्मा-धर्मामध्ये, भाषा-भाषांमध्ये, प्रांता-प्रांतामध्ये, ज्याने करून आमचं भलं झालं पाहिजे. महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे, की अहो आधी रस्ते सुधारा. कल्याणमधील गटारी सुधरवा, रस्त्याची काय हालत झाली आहे ते बघा, नको ते काम करू नका, तुमच्या रस्त्यावर कोंबड्या चरतात, त्या कोंबड्या लोक खातात तरी कमीत कमी, शासनाने याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो, असा हल्लाबोल यावेळी आव्हाड यांनी केला आहे.