scorecardresearch

ठाण्यातील पत्रकार भवनाची जागा अखेर शासनाच्या ताब्यात

गावदेवी येथील ठाणे जिल्हा पत्रकार संघाला पत्रकार भवनासाठी असलेल्या जागेवर ठेकेदाराने इमारत बांधून व्यवसायिक गाळे आणि सभागृहाची परस्पर विक्री केली होती.

ठाण्यातील पत्रकार भवनाची जागा अखेर शासनाच्या ताब्यात
ठाण्यातील पत्रकार भवनाची जागा अखेर शासनाच्या ताब्यात

ठाणे : गावदेवी येथील ठाणे जिल्हा पत्रकार संघाला पत्रकार भवनासाठी असलेल्या जागेवर ठेकेदाराने इमारत बांधून व्यवसायिक गाळे आणि सभागृहाची परस्पर विक्री केली होती. याबाबत पत्रकार संघाकडून करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य शासनाने ही जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही जागा शासनाची असल्याचा फलक तहसीलदार यांच्या नावाने लावावेत. अन्यथा, फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. असे निर्देश उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने १९८८ मध्ये ठाण्यातील गावदेवी मैदानालगतच्या भूखंडावर पूर्वीच्या पत्रकार संघाशी करार केला होता. ठेकेदार राजन शर्मा व किशोर शर्मा यांनी इमारत उभारून पत्रकार संघाला जागा देण्याऐवजी व्यावसायिक गाळे व सभागृहाची परस्पर विक्री केली होती. यासंदर्भात,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ व ठाणे जिल्हा पत्रकार संघाने राज्य शासनाकडे तक्रार केली होती. याबाबत दोन्ही संघांकडून गेली १२ वर्षे पाठपुरावा सुरु होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी शासनासह जिल्हा प्रशासनाकडे याबबात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला होता. शासनाने दिलेल्या जागेचा गैरव्यवहार आणि गैरवापर झाल्यामुळे पत्रकारांसह शासनाची फसवणूक झाली होती. तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यानी याबाबत कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले होते. या जागेवरील पत्रकार भवनांची इमारत ठाणे महापालिकेने धोकादायक असल्यामुळे निष्काषित केली होती. मात्र ठेकेदार शर्मा यांनी बांधलेली अनधिकृत तळ अधिक तीन मजल्याची इमारत पत्रकार भवनांच्या भूखंडावर उभी असल्याने आणि ती जागा आता शासनाच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे ही इमारत लवकरच तोडण्यात येणार आहे. तसेच येथील इमारतीचा वीज पुरवठा खंडीत करून ३०० चौरस मीटरच्या या मोकळ्या होणाऱ्या जागेवर तारेचे कुंपण करून ही जागा शासनाची असल्याचा फलक तहसीलदार यांच्या नावाने लावावेत. अन्यथा, फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. असे निर्देश उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी दिले आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या