रविवारी पहिला कार्यक्रम

कट्टा संस्कृतीचे माहेरघर म्हणून नावारूपाला येणाऱ्या ठाणे शहरामध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कचराळी कट्टा स्थापन होत आहे. ठाणे शहराला अत्रे कट्टा, अभिनय कट्टा, ब्रह्मांड कट्टा अशा वेगवेगळ्या कट्टय़ांची परंपरा लाभलेली असतानाच त्यामध्ये आता कचराळी कट्टय़ाची भर पडणार आहे.
ठाण्यातील कचराळी तलाव येथे सुरू होणाऱ्या कचराळी कट्टय़ावर महिन्याच्या पहिल्या रविवारी म्हणजेच ८ नोव्हेंबरपासून ‘सुसंवाद’ हा उपक्रम सुरू होत आहे. दर महिन्याच्या पहिला शनिवार आणि रविवारी कचराळी तलावाच्या अॅम्फी थिएटर परिसरात सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मनोरंजनपर, प्रबोधनपर, व्याख्याने, मुलाखती, दृक्श्राव्य माध्यमातील सादरीकरण, चित्रप्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सुसंवाद उपक्रम यशस्वी होण्यासाठी शहरातील विविध संस्थांनी पुढाकार घेतला असून प्रत्येक महिन्याला एक संस्था कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
उपक्रमामध्ये सीनियर सिटिझन क्लब नॉर्थ, मराठा मंडळ ठाणे, हास्य क्लब कचराळी तलाव, शिव ओंकार सेवा संघ, व्यास क्रिएशन्स, शब्दश्री क्रिएशन्स या संस्थांचा सहभाग आहे. उपक्रमांतर्गत सहभागी संस्थांच्या कार्याची ओळखही करून देण्यात येणार आहे. उपक्रमाची सुरुवात सीनिअर सिटिझन क्लब नॉर्थ या संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमातून होणार आहे. गायक, संगीतकार राम दीक्षित यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन या वेळी करण्यात आले आहे.

नियोजित नाटय़ संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे उपस्थित होते.