scorecardresearch

कल्याण : एक्सप्रेसमध्ये चढताना तोल जाऊन तरुणाचा मृत्यू

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Kalyan Death of a young man who lost his balance while boarding an express

मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात धावत्या एक्सप्रेसमध्ये सामानाच्या पिशव्या घेऊन चढताना, तोल गेल्याने रुळावर पडून एका पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बनारस या आपल्या मूळ गावी हा तरुण कुटुंबियांसह चालला होता. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ओमप्रकाश सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. बनारस एक्सप्रेस रात्री बारा वाजताच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात येते. हा तरुण आपल्या कुटुंबियांसह आवश्यक घरगुती सामानाच्या पिशव्या घेऊन फलाटावर आला होता. एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार वर आली. या तरुणाने आरक्षित केलेला आसनांचा डबा तो उभ्या असलेल्या ठिकाणी न येता पुढच्या बाजूला आला. त्यामुळे सिंग कुटुंबीयांची सामानाचा बोजा घेऊन डबा पकडण्यासाठी धावपळ झाली.

ओमप्रकाशने प्रथम आपल्या कुटुंबियांना डब्यात बसविले. त्यानंतर स्वतःच्या हातात दोन पिशव्या घेऊन तो डब्यात चढत असताना अचानक एक्सप्रेस सुरू झाली. त्याने तशा परिस्थितीत सामान घेऊन दरवाजा जवळ असलेल्या दांडीला पकडून डब्यात घुसण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये सामान असलेल्या पिशव्यांमुळे तो धावत्या गाडीत चढू शकला नाही आणि त्याचा तोल गेला. त्याचा दांडीवरील हात सटकला आणि तो फलाटावरून रुळावर पडला. त्यामध्ये ओमप्रकाशचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशांनी आरडा ओरडा केल्यानंतर गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी ओमप्रकाशचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kalyan death of a young man who lost his balance while boarding an express abn