कल्याण-डोंबिवली महापालिका जागा भाडेपट्टय़ाने देणार

पुरेसे वाहनतळ नसल्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर निर्माण होत असलेली पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अडगळीत पडलेले शहरातील तीन वाहनतळ तातडीने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने गृहसंकुलांच्या उभारणीतून विकसित केलेले काही वाहनतळ विकासक आणि पालिका यांच्या वादामुळे वापराविना पडून आहेत. यापैकी चिकणघर येथील संतोषी माता मार्ग, कल्याण-ठाकुर्ली समांतर रस्ता येथील कचोरे गाव आणि आयरे गाव भागातील तीन वाहनतळ भाडेपट्टय़ावर देऊन सुरू करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.

अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या यामुळे कल्याण, डोंबिवली या शहरांतील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच पार्किंगची समस्या वाहतूक कोंडीला पोषक ठरत आहेत. शहरांत पुरेसे वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेलाच अनेक वाहने उभी केली जातात. कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, शहाड, कोपर, विठ्ठलवाडी, टिटवाळा, आंबिवली या रेल्वे स्थानकांच्या परिसरात रेल्वेने उभारलेले वाहनतळ केव्हाच पुरेनासे झाले आहेत. रस्त्यांच्या कडेला वाहनतळांची सोय करून शुल्क आकारणी करण्यात  येत असली तरी याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने नवीन वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने गृहसंकुलांना परवानगी देताना सुविधा उभारणीच्या माध्यमातून शहरातील काही भागांत वाहनतळांची उभारणी करून घेतली आहे. यापैकी बरेचसे वाहनतळ गेली अनेक वर्षे अडगळीत होते. यापैकी तीन वाहनतळ खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  चिकणघर, कचोरे आणि आयरे गाव या भागांतील वाहनतळ सुरू करण्यासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पार्किंगचे दर निश्चित

पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदा सूचनेनुसार वाहनतळाच्या वापरासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अनुक्रमे १३५ आणि ३३५ रुपये मासिक शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, हे दर नंतर वाढण्याची शक्यता आहे. चार तासांच्या पार्किंगसाठी दुचाकीला पाच, तर चारचाकीला दहा रुपये मोजावे लागतील. संपूर्ण दिवसाच्या पार्किंगसाठी दुचाकीसाठी १५, तर चारचाकीसाठी ३० रुपयांचे शुल्क आकारले जाणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली शहरामध्ये अधिकृत वाहनतळांची संख्या अत्यल्प असून पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग प्लाझा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या वाहनतळांसाठी आरक्षित भूखंडावर पार्किंग सेवा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

– धनाजी तोरस्कर, उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका