कल्याण नीलम गेस्ट हाऊसमधील प्रियकर आणि प्रेयसीच्या मृत्यू प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. प्रेयसीची हत्या करण्याआधी तरुणाने रक्ताला कुंकू बनवून प्रेयसीच्या कपाळावर लावले. हिंदी चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे तरुणाने आपला हात कापला व तेच रक्त प्रेयसीच्या कपाळावर लावले. शुक्रवारी कल्याणच्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये अरुण गुप्ता आणि प्रतिभा प्रसाद दोघे मृतावस्थेत सापडले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

अरुणने प्रतिभाची गळा आवळून हत्या केली नंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवले अशी माहिती महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पीआर लोंढे यांनी दिली. गावी वाराणसीला चाललोय असे सांगून अरुण गुप्ता घरातून बाहेर पडला होता. पण तो कल्याणमध्ये आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. हत्या करण्याआधी अरुणने खिशातून ब्लेड काढलं. त्याच ब्लेडने स्वत:चा हात कापला व रक्त कुंकू म्हणून प्रतिभाच्या कपाळावर लावलं.

प्रतिभाची हत्या करण्याआधी त्याने तिच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला. शुक्रवारी दुपारी १.३०च्या सुमारास दोघे गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. संध्याकाळी फक्त एकदा त्यांनी पाणी मागितले त्याशिवाय ते रुममधून बाहेर आले नाहीत. रात्री ९.३० च्या सुमारास हॉटेलमधल्या कर्मचाऱ्याने जेवणासाठी म्हणून त्यांना आवाज दिला. दार ठोकल्यानंतरही आतून काही प्रतिसाद आला नाही. कर्मचाऱ्याला संशय आला म्हणून त्याने पोलिसांना कळवले.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा प्रतिभा बिछान्यावर पडलेली होती तर अरुणने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. पोलिसांना त्याच्या मृतदेहाजवळ ब्लेडही सापडला. नेमकी कुठल्या कारणामुळे हत्या आणि आत्महत्या झाली ते पोलिसांना समजलेले नाही. अरुणने प्रतिभाला त्याच्यासोबत गावी येण्यास सांगितले असेल. तिने नकार दिल्यानंतर त्याने तिची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. वर्षभरापूर्वी दोघांची फेसबुकवर ओळख झाली होती. अरुण उत्तर प्रदेश आझमगडचा रहिवासी होता. प्रतिभा मुंबईत घाटकोपर येथे राहायला होती.