जागतिकीकरणानंतर पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दोन्ही खाद्यसंस्कृती हातात हात घेऊन खवैयांच्या जिभेचे चोचले पुरविताना दिसतात. मुंबई-ठाण्यात त्याची प्रचीती येते. वडापाव, इडली-डोसा, पावभाजी, विविध भाज्यांचे पराठे या अस्सल भारतीय पदार्थाबरोबरीनेच पिझ्झा, बर्गर, व्रॅप, हॉट डॉग, कबाब अशा विविध देशांमधील पदार्थ सहज खायला मिळतात. कर्माज् फूड ट्रक त्यापैकीच एक. ठाण्यातील हे पहिले फिरते खाऊचे दुकान. आपल्याकडे फिरते खाऊवाले नवे नाहीत. अगदी पूर्वीपासून कुल्फी, आईसक्रीम, इडलीवाले घरोघरी जाऊन खाऊसेवा पुरवीत आले आहेत. त्याचेच आधुनिक रूप म्हणजे फूड ट्रक. ठाणेकर या ट्रक संस्कृतीच्या चांगलेच प्रेमात आहेत.
फूड ट्रक म्हणजेच चालत्या-फिरत्या खाऊ कॉर्नरची सुरुवात इ.स. १८०० मध्ये अमेरिकेत झाली व १८६६ मध्ये चार्ल्स गुडनाइट या अमेरिकी गुराख्याने अमेरिकन लष्कराच्या एका जुन्या पण धडधाकट गाडीमध्ये अमेरिकी सैनिकांसाठी फूड ट्रक सुरू केला होता व कालांतराने म्हणजेच १९५० मध्ये त्याचे मोबाइल कॅन्टीन असे नामकरण झाले. ठाण्यातील खाद्यरसिकांना पूर्वी फूड ट्रकमधील खाद्याची लज्जत अनुभवण्यासाठी बी.के.सी., नवी मुंबई अशा ठिकाणी जावे लागायचे. ठाणेकरांचे फूड ट्रकविषयीचे हे कुतूहल लक्षात घेऊन तसेच त्यांना बाहेरच्या देशातील पदार्थ आपल्या भारतीय पद्धतीमध्ये व भारतीय चवीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी संदीप देसाई व शीतल देसाई यांनी ठाण्यात ‘कर्माज् फूड ट्रक’ सुरू केला.
‘कर्माज् फूड ट्रक’चे वेगळेपण म्हणजे तिथे मिळणारे हॉट डॉग. हॉट डॉग हा खरा मांसाहारी प्रकार असला तरी येथे आपल्याला शाकाहारी म्हणजेच ‘व्हेज हॉट डॉग’चीही चव चाखायला मिळते. रेग्युलर चिकन हॉट डॉगबरोबर येथे स्मोकी सॉसेज असलेला फ्रँक फर्तर (Frank Furter) हॉट डॉग, कांदा, चीज व चिकनचे मिक्स सॉसेज असलेला ओनिअन चीज चिकन हॉट डॉग, विविध स्पाइसी सॉस व चिकन सॉसेज असलेला स्पाइसी हॉट डॉग, वरील सगळ्या प्रकारच्या चिकन सॉसेजचे मिश्रण असलेला चिकन कॉकटेल हॉट डॉग अशा विविध चविष्ट चिकन हॉट डॉगबरोबरच आलू टिक्की हॉट डॉग व पनीर, विविध भाज्यांचे मिश्रण असलेला मिक्स व्हेज हॉट डॉग म्हणजे हॉट डॉग आवडणाऱ्यांसाठी व नवीन चवीच्या शोधात असणाऱ्या खाद्यप्रेमींसाठी चंगळच आहे.
हॉट डॉगबरोबरच येथे आपल्याला विविध प्रकारचे बर्गर्स, कबाब, व्रॅप व फायरसची चव अनुभवता येते. बर्गर्समध्ये व्हेज बर्गर, हर्ब्स टाकून केलेला व्हेज र्हबस बर्गर, आलू टिक्की बर्गर अशा विविध व्हेजबर्गरबरोबरच क्रिस्पी म्हणजेच फ्राइड चिकन असलेला चिकन क्रिस्पी बर्गर, रेग्युलर चिकन बर्गर, ग्रिल्ड चिकन असलेला चिकन ग्रिल बर्गर, तिखट चव असलेला चिकन पिरीपिरी ग्रिल्ड बर्गर असे विविध प्रकारचे बर्गर येथे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे तिखट चवीचे मायोनीज असलेला चिकन पिरीपिरी व्रॅप, चिकन टिक्का व्रॅप, इंडिअन स्पाइसी सॉसमध्ये बनवलेला हॉट अ‍ॅण्ड स्पाइसी व्रॅप तसेच वैशिष्टय़पूर्ण असे फिश व्रॅप, प्रॉन्झ (कोळंबी) व्रॅप, ग्रिल्ड क्रॅब (खेकडा) आदी विविध प्रकारच्या सॉसप्रमाणे नाव असलेले बुलेट सॉसेज व्रॅप, जर्मन सॉसेज व्रॅप, ग्रिन चिली व्रॅप, त्याचबरोबर पंजाब ए बिहार म्हणजेच पनीर टिक्का व्रॅप. तिखट चव असलेला पिरीपिरी पनीर व्रॅप, स्पेशल कर्माज् सॉस असलेला आलू टिक्की व्रॅप, बटर आलू व्रॅप, मश्रूम व्रॅप व सोयाचंक व्रॅप अशा विविध प्रकारच्या व्रॅपची चवही आपल्याला चाखता येते.
बर्गर, हॉट डॉग व व्रॅप अशा फास्ट फूड बरोबरच फ्राय केलेले क्रॅन्ची चिकन, चिकन नगेट्स, ब्रेडेड फिश फिंगर, क्रिस्पी पार्सले म्हणजे ज्युसी फ्रेंच फ्राइस, कोटेड पोटॅटो विथ डीप असे हलकेफुलके स्टार्टर म्हणजे एका वेळेचा नाश्ताच. तसेच चिकन मलई टिक्का, बंजारा कबाब, पहाडी कबाब, तंगडी कबाब अशा नॉन व्हेज कबाबबरोबरच पनीर टिक्का कबाब, पनीर बंजारा कबाब, भाज्यांचा खिमा चीजमध्ये मिसळवून चीज सॉसबरोबर सव्‍‌र्ह करण्यात येणारा चीज गार्डन टिक्की कबाब असे विविध प्रकारचे नावीन्यपूर्ण कबाब म्हणजे एक प्रकारची फास्ट फूड मेजवानीच.
‘कर्माज् फूड ट्रक’चे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारा फ्रॅक फर्तर Frank Furter). कोळशाच्या भट्टीवर भाजलेले स्मोकी सॉसेज, कांदा, सिमला मिरची व टॉमेटो हॉट डॉगच्या बनमध्ये घालून त्यावर स्पेशल घरी बनवलेला कर्माज हॉट डॉग सॉस व मस्टर्ड सॉस टाकून फ्रॅन्कफर्तर हा हॉट डॉग तयार केला जातो. चिकन पिरीपिरी व्रॅप म्हणजे पिरीपिरी ही दक्षिण आफ्रिकेतील मिरची मायोनीज सॉसमध्ये टाकून एक विशिष्ट सॉस तयार केला जातो. पिरीपिरी सॉस व ग्रिल्ड चिकन एकसंध करून त्यावर कांदा व सिमला मिरची टाकून ते मिश्रण पोळीसारख्या मैद्याच्या रोलमध्ये टाकून तो रोल ग्रिल करून हा व्रॅप तयार केला जातो.

कर्माज् फूड ट्रक,
निहारिका बिल्डिंगजवळ,
हिरानंदानी मेडोज, ठाणे (प)
वेळ – संध्याकाळी ६.३० ते रात्री १२

जतीन तावडे