खड्ड्यांना ‘सार्वजनिक’ अभय; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल कारभारामुळे कशेळी-काल्हेर रस्ता अजूनही खड्ड्यात

गोदामांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात हजारो मोठ-मोठ्या कंपन्यांचे गोदामे आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल कारभारामुळे कशेळी-काल्हेर रस्ता अजूनही खड्ड्यात

ठाणे : ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये दररोज होणारी वाहन कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वाहतूक विभागाचे जवळपास संपूर्ण पथक गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र राबताना दिसत असली, तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालढकल कारभारामुळे कशेळी-काल्हेर हा कोंडीचा केंद्र बिंदू ठरलेला रस्ता मात्र अजूनही खड्ड्यात आहे.

‘खड्डे बुजवा अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ अशा शब्दांत सर्वच शासकीय यंत्रणांचे पालकमंत्र्यांना कान उपटल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ढिम्म हलत नसल्याचा अनुभव येत आहे. अद्यापही कशेळी-काल्हेर ते अंजुरफाटा या सहा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ट्रक-टेम्पोसारखी जड वाहने रस्त्यात बंद पडत असून काही वाहने खड्ड्यांमध्ये उलटत आहे. या सर्व प्रकारामुळे वाहतूक पोलिसांचा भार वाढला असून त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. 

गोदामांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात हजारो मोठ-मोठ्या कंपन्यांचे गोदामे आहेत. त्यामुळे गुजरात, कर्नाटक यांसारख्या राज्यातून तसेच जेएनपीटी बंदरातून हजारो अवजड वाहने शहरात दाखल होत असतात. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामांमुळे येथील लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळही वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे, भिवंडी शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून शहरातील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य रस्ते विकास महामंडळ, ठाणे पालिकेकडून खड्डे बुजविण्याची कामे सुरू झालेली आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनीही नियोजन करून शहरातील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. असे असले तरी भिवंडी शहरात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याची कामे हाती घेतलेली नाहीत. त्याचा परिणाम या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तीन ते साडेतीन फूट खोल आणि १० ते १२ मीटर रुंद आकाराचे खड्डे या भागात पडले आहेत. अनेक दुचाकी या खड्ड्यात पडत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग काय म्हणते?

कशेळी खाडी पूल ते अंजुरफाटा हा ६ किलोमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. २०११ मध्ये या रस्त्याचे बांधकाम झाले होते. मात्र मेट्रो निर्माणाचे काम सुरू झाल्यानंतर या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) रस्त्याच्या मुख्य रस्त्यात अडथळे उभारले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा शिल्लक  राहते. तसेच ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या अनेक संकुलाच्या मलनिस्सारण वाहिन्या गटारांमध्ये सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी तुंबत असून ते पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे येथील रस्तेही वाहून जात आहेत. 

कशेळी ते अंजुरफाटा या मार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्यास मंजुरी मिळताच कामाला सुरुवात केली जाईल. – विलास कांबळे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kasheli kalher road is still in a ditch due to mismanagement public works department akp

ताज्या बातम्या