निविदा प्रक्रियेलाही सुरुवात नाही

मुख्य सभागृहातील छताच्या सुशोभीकरणाचा काही भाग कोसळल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह आणखी दोन महिने तरी रसिकांसाठी खुले होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. नाटय़गृहाच्या दुरुस्तीचे काम नेमके कुणी करायचे याविषयी अभियांत्रिकी विभागात एकवाक्यता होत नसल्याने गेले दीड महिने यासंबंधी कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आडवी आल्याने निविदा प्रक्रिया रखडली. त्यामुळे दुरुस्ती अद्याप कागदावर असून ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस नाटय़गृह रसिकांसाठी खुले होईल, असा दावा आता प्रशासनाकडून केला जात आहे.

दीड महिन्यांपूर्वी मुख्य सभागृहातील छताच्या सुशोभीकरणाचा काही भाग कोसळला. तेव्हापासून नाटय़गृह बंद आहे. नाटय़गृहाचे काम टीडीआरच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराकडूनच करून घ्यावे, अशास्वरूपाचे मत अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला मांडले. बिल्डरकडून फारशी दाद मिळत नाही हे लक्षात येताच अखेर महापालिकेच्या तिजोरीत दुरुस्ती करायची असे ठरले. तोपर्यंत विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे हा प्रस्ताव कागदावरच राहिला. आचारसंहिता संपताच प्रशासनाने आता प्रस्तावाच्या मंजुरीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, या प्रक्रियेसाठी आणि प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम होण्यासाठी दोन महिने लागण्याची शक्यता आहे.