बदलापूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहापुरात रंगलेल्या शेतकरी मेळाव्यात भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात विसंवाद असल्याचे दिसून आले आहे. दोघे एकमेकांच्या कार्यक्रमांत जाणे टाळतात. त्यामुळेच किसन कथोरे यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याची चर्चा रंगली आहे.
देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कपिल पाटील फाऊंडेशन या कार्यक्रमाचे सहआयोजक होते. मेळाव्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भाजपचे सर्वच आमदार, नगरसेवक, पदाधिकारी झाडून झटकून उपस्थित होते. मात्र, भाजपच्या ग्रामीण राजकारणाचा चेहरा म्हणून परिचित असलेले मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे या मेळाव्याला उपस्थित नव्हते.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून या शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचे बोलले जाते. या निवडणुकीत कथोरे यांनी एकहाती किल्ला लढवला आणि भाजपला विजय मिळाला. त्यानंतर झालेल्या मुरबाड आणि शहापूर नगर पंचायत निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळाले. मुरबाड नगरपंचायतीत तर ज्या भाजप उमेदवारांना कथोरे यांनी तिकिट देण्यास नकार दिला होता त्या उमेदवारांनी केंद्रीय मंत्री पाटील यांच्याकडून तिकिटे मिळवली. त्या उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला. कोणतीही नाराजी नसल्याचे कथोरे यांनी सांगितले आहे. तर बैठकीत असल्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
पाटील यांची सरशी
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नांदणारे कपिल पाटील आणि कथोरे सध्या भाजपमध्ये आहेत. किसन कथोरे तुलनेने कपिल पाटील यांना वरिष्ठ आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने राजकारणात त्यांचे वजन वाढले आहे. त्यामुळे वर्चस्वावरून दोघांमध्ये वाद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे कपिल पाटील यांच्या कार्यक्रमात कथोरे गैरहजर असतात.
काही टाळता न येणारे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मेळाव्याला जाता आले नाही. मात्र, त्याची पूर्वकल्पना देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. त्यांच्याशी बोलणेही झाले होते.-किसन कथोरे, आमदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kathorechi dandi farmers meet discussion union minister kapil patil amy
First published on: 22-04-2022 at 00:51 IST