कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. नागरिक खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. नागरिकांना आपल्या परिसरातील, पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या घर बसल्या तक्रारी करता याव्यात म्हणून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने १८००२३३००४५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून चोवीस तासात केव्हाही नागरिक पालिका हद्दीतील खड्डेविषयक पालिकेकडे तक्रारी करू शकतात, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी फक्त रस्ते खोदून ठेवले आहेत. या भागातील कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा, महाराष्ट्रनगर भागात हे चित्र दिसत आहे. रस्त्यासाठी गरीबाचापाडा भागातील खोदलेल्या खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

एमएमआरडीएच्या नियंत्रणाखालील रस्त्यांवरील खड्डे एमएमआरडीए ठेकेदार भरत नाहीत आणि पालिकेलाही त्या ठिकाणी एमएमआरडीएची रस्ते काँक्रिटीकरणासाठी खोदकाम, गटारांची कामे सुरूअसल्याने खड्डे भरणीची कामे करता येत नाहीत. डोंबिवलीत टिळक पुतळ्याजवळ एमएमआरडीएचे रस्ते काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दररोज दुचाकी स्वार घसरून पडत आहेत. परंतु मध्यवर्ति ठिकाणचा खड्डा पालिका आणि एमएमआरडीएकडून भरला जात नसल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. खड्ड्यांमुळे मुलांना घेऊन जाणाऱ्या शालेय बस शाळेत, घराकडे जाताना उशिराने धावतात. त्यामुळे पालक, शाळा संस्था चालक त्रस्त आहेत.

शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या विषयीच्या पालिकेतील तक्रारी वाढल्या आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, जगदीश कोरे यांच्या उपस्थितीत कल्याणमधील मिलिंदनगर, गौरीपाडा, योगीधाम, पुनालिंक रस्ता, कल्याण पूर्वेत पुना जोड रस्ता, चक्कीनाका, मलंग नेवाळी या वर्दळीच्या खड्डे पडलेल्या रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यांवरील खड्डे गुणवत्तापूर्ण पध्दतीने भरण्यात यावेत, असे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाळ्यापूर्वी खड्डे भरणीची कामे सुरू असताना यावर्षी मे अखेरलाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे खड्डे भरणे, रस्ते सुस्थितीत करण्याच्या कामात पालिकेला अडथळे आले. पावसाळ्यापूर्वीची खड्डे भरणीची कामे पावसामुळे पालिकेच्या ठेकेदारांना करता आली नाहीत. पावसाचे प्रमाण वाढल्यावर हे खड्डे वाढत गेले, असे पालिकेचे म्हणणे आहे. गणेशोत्सवापूर्वी आणि पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर सर्व खड्डेमय रस्ते सुस्थितीत केले जातील. तत्पूर्वी पाऊस सुरू असला तरी आवश्यक बाब म्हणून खड्डे पडलेल्या रस्त्यावरील खड्डे खडी, माती टाकून भरण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत, असे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले.