कल्याण-डोंबिवली(कडोंमपा) आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दोन्ही महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मतदानापूर्वीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन १ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, मतदानाच्या दुसऱयाच दिवशी म्हणजे २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे.
दोन्ही महापालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेसोबतच नवनिर्मित ३ नगरपरिषदा व ६४ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. कडोंमपा आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना ६ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज सादर करता येतील. १४ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तर, अर्ज मागे घेण्यासाठी १६ ऑक्टोबर ही अंतिम मुदत असेल. १७ ऑक्टोबरला मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
दुसरीकडे, नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज सादर करता येतील. तर, ९ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबरपर्यंत आहे.
दरम्यान,  कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागांसाठी निवडणूक होणार असून येथे एकूण १३ लाख मतदार आहेत. तर, कोल्हापूरमध्ये ८२ जागांसाठी महापालिकेचा रणसंग्राम होणार आहे. कोल्हापूरात ४.५ लाख मतदार आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत येत्या ११ नोव्हेंबपर्यंत नवी राजकीय व्यवस्था उभी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर लगेचच दुसऱया दिवशी निकाल जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. महापालिका निवडणुकीच्या मतदार याद्या अंतिम करण्याची मुदत ३ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे.
निवडणूक होत असलेल्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार असून निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशी मतदानाची वेळ असेल.