डोंबिवलीतील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सावरकर रस्त्यावरील वाहनतळ आरक्षणाच्या जमिनीवर झोपडय़ा थाटणाऱ्याला महापालिकेने नोटीस बजावली आहे. ही जागा हडप करण्याचा या झोपडीधारकाचा डाव असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविकेने महापालिकेत केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पालिकेच्या ‘फ’ प्रभाग अधिकाऱ्याने झोपडीधारकाला झोपडी हटवण्याची नोटीस बजावली आहे.
सावरकर रस्त्यावरील वाहनतळाच्या आरक्षणावर कैलास डोंगरे नावाच्या व्यक्तीने अनेक महिन्यांपासून एक झोपडी बांधली आहे. मात्र हळूहळू झोपडीचा विस्तार करत ही जागा हडपण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला आहे, अशी तक्रार स्थानिक नगरसेविका अर्चना कोठावदे यांनी आयुक्तांकडे केली होती. तक्रार करूनही आयुक्त कार्यालयाकडून दखल घेण्यात येत नव्हती. ‘लोकसत्ता ठाणे’ने या बाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच, डोंबिवली ‘फ’ प्रभागचे प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांनी झोपडीधारक कैलास डोंगरे यांना वाहनतळाच्या आरक्षणावरील झोपडीबाबत काही अधिकृत कागदपत्र असल्यास ते तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश नोटिशीद्वारे दिले आहेत.
कागदपत्र सादर न केल्यास झोपडी हटवण्याचे आदेश दिले आहेत. विनायक पांडे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाला पत्र देऊन या वाहनतळ आरक्षणाच्या चतु:सीमा निश्चित करण्याचे सूचित केले आहे. मालमत्ता विभागाने या आरक्षणाभोवतीच्या मालमत्तांचे मूल्यांकन करून द्यावे अशी मागणी मालमत्ता विभागाकडे केली आहे. वाहनतळाचे सीमांकन निश्तिच झाल्यास आरक्षणाच्या चारही बाजूला कोणतीही अधिकृत मालमत्ता नसल्याचे स्पष्ट झाल्यावर तातडीने या आरक्षणावरील अतिक्रमित झोपडी तोडण्याची कारवाई केली जाईल, असे प्रभाग अधिकारी पांडे यांनी सांगितले.