कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाला खेटून असलेले राज्य परिवहन महामंडळाचा आगार हे कल्याणमधील वाहतूक कोंडीचे मुख्य केंद्र बनले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हे आगार इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या कामासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या पंचवार्षिक आराखडय़ात आगार स्थलांतराचा विषय घेण्यात आला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर दीड ते दोन एकर जागेत हे आगार आहे. या आगारातून राज्याच्या विविध भागांत गाडय़ा सोडल्या जातात. बाहेरच्या भागातील बस नियमित प्रवासी वाहतूक करतात. धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोकणातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस कल्याण आगारात येण्यासाठी दुर्गाडी किल्ला, शिवाजी चौक, गुरुदेव हॉटेल, महालक्ष्मी हॉटेल येथून, मुरबाड रस्त्याने शहरात शिरतात. त्यामुळे आधीच निमुळत्या असलेल्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. शहरातील चारचाकी वाहने, रिक्षा, दुचाकींची वर्दळ त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत अनेक वेळा या बस अडकून पडतात. या बसची आगारात सतत येजा असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. हा विचार करून आगार शहराबाहेरील खडकपाडा, वायलेनगर येथील आरक्षित भूखंडावर स्थलांतरित करून लांब पल्ल्याच्या सर्व बस या आगारातून सोडण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीही कमी होईल, तसेच इंधनाचा वाढीव खर्चही कमी होईल, असा प्रयत्न केला जात आहे. यासाठी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी अर्थसंकल्पात आगाराचे स्थलांतर व नवीन जागेत आगार सुरू करण्याच्या कामासाठी १ कोटीची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या आगाराचे लवकर शहराबाहेर स्थलांतर करावे या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असे गायकर यांनी सांगितले.
घरबसल्या स्मशानभूमीतील चित्रण
शहरातील पॅगोडा पद्धतीच्या सर्व स्मशानभूमींमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. अनेक घरातील कुटुंबीय नोकरी, शिक्षणासाठी परदेशी असतात. त्यांना घाईने भारतात येऊन आपल्या मयत नातेवाइकाचे अंत्यदर्शन घेता येत नाही. अशा कुटुंबीयांना स्मशानभूमीतून सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घरबसल्या, परदेशात राहूनही अंत्यदर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात दोन कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॅडमिंटन कोर्टाच्या ठिकाणी वाहनतळ
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ अनेक वर्षांपासून जागेच्या वादामुळे पडीक असलेल्या बॅडमिंटन कोर्टाच्या ठिकाणी वाहनतळ सुरू करण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात सुचविण्यात आले आहे. रेल्वे स्थानक परिसरात अधिकाधिक वाहनतळांची गरज आहे. बॅडमिंटन कोर्टाचा वापर सध्या कचरा वेचक, भंगार विक्रेते करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या जागेच्या जमिनीचा वाद मिटेपर्यंत ताबा घेऊन तेथे चारचाकी, दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ सुरू करण्यात यावा, असे सुचविण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc make provision of one crore againt kalyan st depot
First published on: 16-03-2016 at 05:35 IST