गुढीपाडव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीतील स्वागत यात्रेत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा यादरम्यानच्या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना पालिका विरोधी पक्षनेत्यांनी फैलावर घेतले.
नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीत येणार असल्याने अनेक महिन्यांपासून रखडलेल्या घरडा सर्कल ते मंजुनाथ शाळा रस्त्यावर निकृष्ट साहित्य वापरून रस्ता दुभाजक, तीन फूट उंचीची शोभेची झाडे अधिकाऱ्यांनी लावली आहेत. या निकृष्ट कामांवरून विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी ठेकेदाराची कानउघाडणी करून प्रकल्प अभियंता, पर्यवेक्षक यांना फैलावर घेतले.
पाथर्ली नाका, शेलार चौक भागात रस्ता दुभाजकांमध्ये प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून ठेकेदाराने तीन फूट उंचीची झाडे लावली होती. खाली सिमेंट रस्ता, त्यात दुभाजकामध्ये माती टाकून झाडे लावण्यात आली आहेत. झाडे जगणार नसतील तर मुख्यमंत्र्यांसमोर खोटा देखावा उभा करण्यासाठी पालिकेच्या पैशांची का उधळपट्टी करता, असा सवाल विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला. रस्ता दुभाजकासाठी वापरलेले खांब, रेतीऐवजी वापरलेले निकृष्ट साहित्य, पेव्हर ब्लॉक या विषयांवरून राणे यांनी या प्रकल्पाचे अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची कानउघाडणी केली.