कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) बसमध्ये तिकिटाच्या सुटय़ा पैशावरून प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात होणारी हमरीतुमरी हा नित्याचाच प्रकार आहे. मात्र, आता लवकरच ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे आहेत. प्रवाशांचा केडीएमटी बसमधील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मोबाइलवरून तिकीट उपलब्ध करून देणारे अँड्रॉइड अॅप परिवहन विभागाने विकसित करून घेतले आहे. त्या अॅपवरून प्रवासी केडीएमटीचा मासिक वा त्रमासिक पास घरबसल्या काढू शकतात.
कल्याण-डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील आणि परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांच्या उपस्थितीत सोमवारी या अॅपचे सादरीकरण करण्यात आले. सुपरनिट्रो टेक या कंपनीने हे अॅप विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून केवळ १५ ते २० दिवसांच्या तिकिटांच्या रकमेत प्रवाशांना महिनाभराचा प्रवास करता येईल. सर्वसाधारण नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा तीन प्रकारांत पासचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या अॅपमुळे प्रवाशांना तिकिटासाठी सुट्टे पैसे ठेवण्याची गरज पडणार नाहीच; शिवाय परिवहन व्यवहारामध्येही पारदर्शकता येऊ शकणार आहे.
ई-तिकीट असे काढा
* अँड्रॉइड फोनमधील प्ले स्टोअरमधून ‘केडीएमटी एमपी’ हे मोबाइल अॅप डाऊनलोड करता येईल. ते इन्स्टॉल करून प्रवाशाला आपली संपूर्ण माहिती त्यात भरावी लागेल.
* या माहितीची खातरजमा करून झाल्यानंतर काही तासांमध्ये प्रवाशांना ओळख क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल.त्या आधारे प्रवासी अॅपचा वापर करू शकतात.
* बसचा अपेक्षित मार्ग निवडल्यानंतर त्या प्रवासाच्या मासिक वा त्रमासिक पासचे पैसे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेटबँकिंग या माध्यमातून भरता येतील.
* बसमध्ये वाहकाला अॅप दाखवून तिकीट वैध करता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2015 रोजी प्रकाशित
केडीएमटीचे तिकीट आता मोबाइलवर
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या (केडीएमटी) बसमध्ये तिकिटाच्या सुटय़ा पैशावरून प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात होणारी हमरीतुमरी हा नित्याचाच प्रकार आहे.
First published on: 10-02-2015 at 12:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmt tickets now on mobile