कार्यक्रमाच्या नावाखाली लाखोचा गंडा
खाजगी उपग्रह वाहिनीवर सुरू असलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या नावाखाली नालासोपारा येथील एका अल्पवयीन मुलाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे.
या प्रकरणात पीडीत मुलाची आई कविता झा यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. त्यांच्या १५ वर्षीय मुलाच्या मोबाइलवर एक व्हाटसअप कॉल आला आणि कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाद्वारे लॉटरी लागली असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांना वस्तू आणि सेवा कराचे २० हजार रुपये भरावे लागतील आणि त्यांनी एक खाते क्रमांक पाठवला त्याच सोबत एक चित्रफित पाठवून पैसे कसे भरायचे हे सुधा सांगण्यात आले. या मुलाने आणि अलत्याच्या आईने यावर विश्वास ठेवत दिलेल्या खात्यात पैसे वर्ग केले. त्यानंतर पुढील काही कागदी प्रकियेसाठी आणखी पैसे भरावे लागतील असे सांगून या मायालेकडून वेगवेगळ्या कारणासाठी ११ वेळा एकूण तीन लाख ९२ हजार रुपये लाटण्यात आले. पण इतके पैसे देऊनही लॉटरीची रक्क्म मिळत नसल्याने. त्यांनी दिलेल्या क्रमांवर दूरध्वनी केला असता त्यांना पुन्हा पैसे भरण्यास सांगितले यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार केली. संभाषणाची सुरवात तक्रारदार बिहार येथे असताना झाल्याने पुढील तपास हा बिहार पोलिसांकडे दिला जाणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे यांनी दिली.