एकाच दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या यशस्वी नाटकांच्या अर्धशतकाचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. मुळचे ठाणेकर असलेले दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी ५१ नाटकांचे दिग्दर्शन केले असून त्यांच्या नाटकांच्या अर्धशतकी नाटय़प्रवासाच्या निमित्ताने सहा नाटकांचा नाटय़ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ‘देहभान’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘कहानी मे ट्विस्ट’, ‘जन्मरहस्य’, ‘मी रेवती देशपांडे’ आणि ‘त्या तिघांची गोष्ट’ अशा सहा नाटकांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे. २५ ते ३१ मार्च दरम्यान हा महोत्सव होईल. गडकरी रंगायतनमध्ये रात्री आठ वाजता हा महोत्सव होईल. मंगळवार ३१ मार्च रोजी ‘त्या तिघांची गोष्ट’ हे नाटक दुपारी चार वाजता आहे.  
ठाणे शहरात जन्म आणि शिक्षण झालेल्या कुमार सोहोनी यांनी आत्तापर्यंत ५१ व्यावसायिक नाटके, १७ मराठी चित्रपट, ३ टेलिफिल्म्स, ७ मराठी मालिकंचे दिग्दर्शन केले आहे. कुमार सोहोनी यांनी ‘कलासरगम’ या हौशी नाटय़संस्थेची स्थापना ठाणे शहरात केली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी असलेल्या सोहोनी यांनी ‘मनुस जगत हं’, ‘अग्निपंख’, ‘रातराणी’, ‘वासुची सासू’, ‘देहभान’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कुणीतरी आहे तिथे’अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाटके दिग्दर्शित केली. ठाण्यातील सामाजिक संस्था स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र, ठाणे या संस्थेच्यावतीने सोहनी यांच्या कौतुक सोहळाही होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी कुमार सोहनी लिखीत ‘चौकट दिग्दर्शनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी भाजपचे अखिल भारतीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस दीपक करंजीकर, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षा फैय्याज, निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय़ परिषदेचे ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कुमार सोहोनी यांना सहकार्य करणारे लेखक आणि पडद्यामागच्या कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.