कुपारी महिलांचा पारंपरिक पेहराव इतिहासजमा; वयोवृद्ध ‘बय’च्या जीवनशैलीवर लघुपट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाल रंगाचे लुगडे, त्यावर लाल रंगाची चोळी आणि सोबतच पारंपरिक दागिन्यांचा साज.. हे वर्णन आहे वसई पट्टय़ातील सामवेदी कुपारी समाजामधील महिलेचे. पूर्वी असा पेहराव करणाऱ्या महिला खूप दिसायच्या. वयोवृद्ध असलेल्या अशा महिलांना ‘बय’ म्हटले जाई. मात्र काळाच्या ओघात हा पारंपरिक पेहराव दुर्मीळ होत चालला आहे. केवळ उत्सवाच्याप्रसंगी सध्याच्या महिला असा पेहराव करतात. वसईतील एका तरुणाने कुपारी समाजातील वृद्ध महिला (बय) आणि त्यांच्या जीवनशैलीवर लघुपट तयार केला असून ही संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईच्या कुशीत विसावलेल्या वसई परिसराला एक सांस्कृतिक वारसा आहे. वसईत विविध जाती धर्माचे लोक राहतात. या प्रत्येक धर्मातही पोटजात-संस्कृती आहेत, त्यापैकी एक म्हणजे ख्रिस्ती कुपारी संस्कृती.

वसईत कुपारी समाजाची लोकसंख्या ३५ हजारांच्या घरात आहे. कुपारी लोकांचा हा समूह उत्तर वसईत फार पूर्वीपासून राहत आहे. कुपारी समाजात ‘बय’ महत्त्वाची मानली जाते. वयोवृद्ध महिलांना बय असे म्हणातात. लाल लुगडे आणि हिराण-वाळ्यो-सोळी अशा दागिन्यांचा साज असा तिचा पारंपरिक पेहराव असतो. पूर्वी हा पेहराव वसईत अनेक ठिकाणी पाहावयास मिळायचा. मात्र आता कुपारी लुगडय़ांची जागा मॅक्सी आणि गाऊनने घेतली आहे. नव्या पिढीच्या महिला लुगडी घालत नाहीत. परंतु ज्या बय आज आहेत, त्याच केवळ अशा प्रकारची लुगडी घालतात. या बय आणि त्यांचा पेहराव यांची ओळख करून देणारा लघुपट वसईतील तरुण लेखक फ्रँक मिरांडा यांनी केला आहे.

त्यांनी उत्तर वसईत जाऊन अशा जुन्या आज्यांचा शोध घेतला. जेमतेम ७० ते ७५ बयची संख्या सध्या शिल्लक आहे, असे मिरांडा यांनी सांगितले. या लघुपटाची पटकथा मिरांडा यांनी स्वत: लिहिलेली असून या पटकथा-व्यक्तिचित्राला रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बोलीभाषा स्पर्धेत दुसरे नामांकन मिळाले आहे. या लघुपटाच्या संशोधन आणि निर्मितीसाठी सबिना फोस, सायली कर्वाल आणि सिमरन दोडती यांचाही मोठा हातभार लागला आहे.

फ्रँकने पारंपरिक पेहराव करणाऱ्या ‘बय’ना बोलते करून त्यांच्याकडून जुन्या कुपारी संस्कृतीचा इतिहास जाणून घेतला आहे. आगामी काही वर्षांत हा पेहराव कायमस्वरूपी हद्दपार होणार आहे. त्यामुळे या लघुपटाद्वारे तो जतन करण्याचा प्रयत्न केल्याचे फ्रँकने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kupari women rare traditional clothes
First published on: 12-12-2017 at 02:25 IST