भूमाफियांनी सरकारी जागा हडप करून वसई-विरार शहराच्या पूर्वेला बेसुमार अनधिकृत चाळी उभ्या केल्या आहेत. त्याचे भीषण परिणाम आज वसईकरांना विविध प्रकारे भोगावे लागत आहेत. भूमाफियांची मोठी दहशत या भागात आहे. भूमाफियांच्या वादातून झालेली हत्या आणि भूमाफियांनी पालिकेच्या पथकावर केलेला हिंसक हल्ला या नुकत्याच घडलेल्या दोन घटनांनी या प्रश्नाचे रौद्ररूप समोर आले आहे.

वसईत नुकत्याच झालेल्या दोन हिंसाचाराच्या घटनेने पुन्हा एका अतिगंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे. कामणजवळील शिलोत्तर गावातील माजी सरपंच बबन माळी यांची जमिनीच्या वादातून हत्या झाल्यानंतर उमटलेला हिंसाचार आणि त्यापाठोपाठच पालिकेने अनधिकृत चाळींवर कारवाई सुरू केल्यानंतर चाळमाफियांनी पथकावर केलेला हिंसक हल्ला. या दोन घटनांमुळे केवळ कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न निमाण झालेला नाही, तर वसई-विरारवरील मोठा धोका अधोरेखित केला आहे. बबन माळी यांच्या आदिवासी जमिनी विकत घेऊन औद्योगिक गाळे बांधण्याचा धंदा. त्या वादातून ही हत्या झाली. अनधिकृत बांधकामाच्या धंद्यातील व्याप्ती यावरून लक्षात येईल. दुसरी घटना अशाच भूमाफियांची. वसई पूर्वेच्या राजावली येथे अनधिकृत चाळींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकावर चाळमाफियांच्या समर्थकांनी तुफान हल्ला चढवला आणि अनेक वाहने पेटवून दिली. या दोन्ही घटनांनी वसई-विरार आणि नालासोपारा शहराच्या वेशीवर वसू लागलेल्या अनधिकृत चाळी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पुन्हा समोर आल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी हेतुपुरस्सर केलेले दुर्लक्ष आणि ही अनधिकृत बांधकामे उभी राहू देणारे भ्रष्ट प्रशासन यामुळे भूमाफियांची ही विषवल्ली शहरे गिळंकृत करत आहेत.

१९८०च्या दशकात वसई-विरार शहरे विकसित होण्यास सुरुवात झाली. तेव्हा इमारती आकार घेऊ  लागल्या, परंतु सुरुवातीची १५ वर्षे चाळींचा मागमूस नव्हता. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेतील विस्थापितांसाठी या चाळी आश्रयस्थान बनू लागल्या. मुंबईतले कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्ग या चाळीत येऊ  लागला. त्यानंतर भूमाफियांनी ही संधी हेरली आणि या भागातील वन आणि सरकारी जमिनीकडे आपला मोर्चा वळवला. दिसली जागा की बांध चाळी, असं राजरोस सुरू होतं आणि आजही सुरू आहे. उत्तर प्रदेशातून अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक इथे आले आणि बघता बघता भूमाफिया बनले. हे चाळमाफिया अब्जाधीश झाले आहेत. पाणीमाफिया, वीजमाफिया या भागात सक्रिय आहेत. वीजचोरी सर्वाधिक या भागात होते. मुंबईतले अनेक तडीपार गुंड येथे राहत आहेत. या बेबंद आणि अनधिकृत वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेचं नियोजन कोलमडून पडत असून त्याचा ताण वसई-विरारच्या नागरी सुविधांवर पडत असतो.

चाळमाफिया हे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने पोसलेले गुंड आहेत. बहुतांश चाळमाफिया हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले आहेत. त्यांची प्रचंड दहशत या भागात आहे. मग राजकीय कवच मिळवण्यासाठी स्थानिक सत्ताधारी पक्षाची झूल अंगावर ओढतात. असाच एक जण नगरसेवकही झाला आहे.

नालासोपारात मागील दशकात संतोष भुवन, नगीनदास पाडा या वसाहती उभ्या राहिल्या. भूमाफिया, चाळमाफिया हातपाय पसरत होते. दिवसाढवळ्या हल्ले, गोळीबाराच्या घटना घडत होत्या. अनेक लहानमोठय़ा चाळ बिल्डरांच्या हत्या गेल्या दहा वर्षांच्या काळात झाल्या. त्यांच्या वर्चस्वाला शह देणाऱ्यांना थेट संपवलं जात होतं. नालासोपारा येथील प्रवीण धुळे या युवा कार्यकर्त्यांचीही अशीच दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. ज्यांनी ही हत्या केली, ते आज चाळमाफियांचे शिरोमणी म्हणून सक्रिय आहेत. सुरुवातीला नालासोपाऱ्याच्या पूर्वेला असलेले चाळमाफियांनी आपला मोर्चा वसई आणि विरार पूर्वेला वळवला. संतोष भुवन, नगीनदास पाडा आणि धानीव बाग अस्तित्वात आले. आता नायगाव पूर्वेकडील राजावली, टिवरी, भोयदापाडा या भागांवर अतिक्रमण होऊ  लागले. सर्वसामान्यांची फसवणूक करून या चाळी आणि त्यातील खोल्या विकल्या जातात. एकच खोली अनेकांच्या नावावर देऊन त्यांची फसवणूक केली जाते.

आजही पोलीस या भागात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यास धजावत नाही. वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर या माफियांनी पुन्हा चाळींकडे मोर्चा वळवला आणि हजारो चाळी उभ्या राहू लागल्या. त्यामुळे आयुक्तांनी ही धडक मोहीम हाती घेतली होती. त्या वेळी चाळमाफियांनी हा नियोजनबद्ध हल्ला घडवून आणला. तुफान दगडफेक करत सरकारी वाहनांची दगडफेक केली. वसईच्या अधोगतीला हे चाळमाफिया जबाबदार आहेत, तसेच त्यांना पोसणारे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळेच ही विषवल्ली फोफावली आहे. आता पाणी डोक्यावरून गेले आहे. त्याचे गंभीर परिणाम येत्या काळात वसईकरांना भोगावे लागणार आहेत.

सुहास बिऱ्हाडे suhas.birhade@expressindia.com

@suhas_news