जमशेदपूर येथे पार पडलेल्या सिनीयर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालय व खर्डीच्या खेळाडूंनी राज्याचे नेर्तृत्व करताना ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांवर आपले नाव कोरले. महाविद्यालयाचे प्रशिक्षक प्रा. सुरेश चेडे आणि प्रा. गायकर यांच्या प्रशिक्षणाखाली या खेळाडूंनी यश संपादन केले. राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राज्याच्या महिला गटाने आपला दबदबा कायम राखत सांघिक विजेतेपद मिळवले, तर पुरुष गटाला सांघिक उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेमध्ये राज्याला मिळालेली ४ सुवर्ण पदके ही महिला खेळाडूंनी मिळवून दिली आहेत. विविध राज्यांतील ४५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

 

आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात

ठाणे : जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन कल्याण तालुका व ठाणे जिल्हा संघटना यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा कल्याणच्या वाणी विद्यालयात पार पडल्या.

या स्पर्धेत महानगरपालिका क्षेत्रातील ३८ शाळा आणि नऊ महाविद्यालयांतील २३० खेळाडूंनी सहभागी होऊन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात मानस वेदपाठक, जेसन पिन्टो, साहिल  घुगे, हिमांशु शर्मा, अक्षय पाटील आदी स्पर्धकांनी प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील विजेते खेळाडू रायगड येथील विभागीय तायक्वांडे स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा समिती सदस्य विलास वाघ यांनी केले.

 

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत राहुल सिंगची धडक

ठाणे : शहरातील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या गणेशनगर विद्यालयात शिकणाऱ्या राहुल सिंग (११) याने बॉक्सिंगमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर १४ वर्षांखालील खेळाडूंच्या वयोगटात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. विशेष म्हणजे राज्यस्तरापर्यंत मजल मारणारा राहुल शहरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यातर्फे दर वर्षी क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत बॉक्सिंग क्रीडा प्रकारात टिटवाळा येथील राहुल सिंग, साहिल कातडे व आदित्य जाधव हे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत राहुलने विजय मिळविल्याने त्याची निवड विभागस्तरावर करण्यात आली. आता २० व २४ सप्टेंबर रोजी नंदुरबार येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राहुल सध्या टिटवाळ्यातील विनायक मार्शल आर्ट्स या संस्थेत प्रशिक्षण घेत आहे. त्याचे प्रशिक्षक विनायक कोळी, संतोष मुंढे, हरीश वायदंडे यांनी राहुलचे कौतुक केले.

 

विवियाना मॉल येथे मुंबईच्या सॉकर लीगचा शुभारंभ

ठाणे : उभरत्या खेळाडूंना त्यांचे फुटबॉलमधील कौशल्य दाखवण्यासाठी विवियाना मॉलने स्वत:ची सॉकर लीग सुरू केली आहे. मुंबईतील या बहुचर्चित सॉकर लीगसाठीची नोंदणी सुरू झाली असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. नोंदणीकृत खेळाडूंचा भव्य लिलाव समारंभ विवियाना मॉल सेंटर अट्रियम येथे ३ ऑक्टोबर रोजी होईल तर विवियाना मॉलच्या ड्रिबल फील्डमध्ये ८ ऑक्टोबर रोजी खेळाची सुरुवात होणार आहे.

८ ऑक्टोबर रोजी आठ संघांमध्ये सामना होईल. प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू आणि दोन अतिरिक्त खेळाडूंचा समावेश असेल, तर विवियाना सॉकर लीगची पहिली आवृत्ती जिंकण्यासाठी लढतील. राष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचा मोठय़ा प्रमाणावर विकास झाला आहे. जागतिक फुटबॉल क्षेत्रावर भारतानेही आपला ठसा उमटवण्याची गरज असून त्यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे विवियाना मॉलतर्फे सांगण्यात आले. अधिक माहितासाठी ९७६८५८०७४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

ठाणे मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा

ठाणे : ठाणे असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मॉन्टेक्सबॉल क्रिकेट अंजिक्यपद निवड चाचणी स्पर्धा शनिवार, १७ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातील सर्व शाळा, कॉलेज व क्लब यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या स्पर्धेतून निवडून येणारा उत्कृष्ट संघ सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मॉन्टेक्सबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा संघ म्हणून सहभागी होणार आहे. शनिवारी दुपारी ३ वाजता डोंबिवलीतील के.डी.एम.सी. मैदानात निवड चाचणी होईल. या स्पर्धेत १२ व १४ वर्षांखालील मुलांना सहभागी घेता येणार असून ठाणे जिल्हा मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष प्रा. उदय नाईक यांना ८०९७१३१०९९ या क्रमांकावर संपर्क साधवा.

संकलन : भाग्यश्री प्रधान