लावणीचे नाव घेतले की आपल्या डोळ्यासमोर येते ती नर्तिकांची मादक अदा, नृत्य आणि नखशिखांत शृंगार. एक चांगली कला असूनही लावणीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो. त्यामुळे लावणी म्हणजे भक्तिरस, लावणी म्हणजे तेजो मंदिरात अदृश्यपणे दरवळणारा सुगंध आणि लावणी म्हणजे आत्मिक आनंद अशी जर तिची व्याख्या केली तर रसिकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल. आत्म्याला जणू परमात्म्याशी संवाद साधण्यास भाग पाडणारी कलाही लावणी असू शकते. याचाच प्रत्यय नुकताच कल्याणकर रसिकांना आला. ठाण्यातील नृत्यधारा संस्थेने अत्रे नाटय़मंदिरात आयोजित केलेल्या ‘कथा लावणीची-अदा कथ्थकची’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये कथ्थकचा साज घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने सादर झालेल्या लावणीने रसिक प्रक्षकांची मने जिंकली.
लावणीकडे आज केवळ ग्रामीण भागाची कला म्हणून पाहिले जात आहे. इतर सर्व कलांप्रमाणेच लावणीचाही एक वेगळा इतिहास आहे. हा इतिहास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे लावणीचा ज्वलंत जीवनपट या कार्यक्रमात उलगडण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या चिमुरडय़ा कलाकारांनी कथ्थकचे प्राथमिक धडे आणि ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ या गीतावरील नृत्य सादर केले. त्यानंतर आज गोकुळात रंग खेळतो हरी, मनमोहन नंदलाल, कवी सूरदास यांचे सुरेश बापट यांनी गायलेले ब्रज भाषेतील भजन, काव्य, शब्द, नृत्य, बोल आणि कविता यांचा सुरेख मिलाप असणारे चतुरंग आणि मध्यंतरापूर्वी सादर झालेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा ग पोरी पिंगा या अदाकारींना उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली.
जुगलबंदीला प्रेक्षकांची वाहवा
मध्यंतरानंतर सादर झालेल्या कथ्थकच्या साजातील विविधरंगी लावण्यांना सभागृहाने अक्षरश: डोक्यावर घेतल्याचे दिसून आले. त्यात गणेश नमन, मुजरा, गवळण, बैठकीची लावणी, ढोलकी-तबला-कथ्थकची अनोखी जुगलबंदी अशा एकाहून एक सरस अशा कालाकृतींनी कल्याणकर खरोखरीच मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले. सुरुवातीला कृष्णा मुसळे यांच्या ढोलकीवर आणि नंतर किशोर पांडे यांच्या तबल्यावर मुक्ता जोशी यांनी सादर केलेल्या कथ्थकच्या जुगलबंदीने तर उपस्थितांची मोठी वाहवा मिळवली.
मुक्ता जोशी यांच्यासह नृत्यधारा संस्थेच्या आदिती जोशी, अनुजा वैशंपायन, कादंबरी ओझे, विपाली पदे, श्रेया भोजने, ऋचा कुलकर्णी, प्राजक्ता आपटे, कुंजल लाभे, चारुता माळगावकर, कविता अहिरे-बिऱ्हाडे या ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lavani dance program leaves audience mesmerized
First published on: 24-02-2016 at 05:32 IST