महाराष्ट्राचे मिसळसम्राट अशी ख्याती असलेले आणि ठाण्याच्या मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मणमामा मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरु होते. मामलेदार मिसळ हा ब्रांड निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ठाण्याच्या तहसील कार्यालयाबाहेरील ‘मामलेदार मिसळ’ हा आज एक ब्रँड झाला आहे. मात्र या ब्रँडची मुहूर्तमेढ ठाण्यात १९४६ साली रोवली गेली. या मिसळीने यंदा सत्तरी गाठली आहे, मात्र तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.

हे पण वाचा – BLOG: मुनमुनच्या मिसळीइतक्याच ठसकेबाज मावशींचं पर्व संपलं

extortion and robbery of couple by the police in nagpur
वा रे पोलीस! प्रेमी युगुलांची लुटमार, हफ्तावसुली…
actress raveena tondon marathi news
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
Senas Chandrahar Patil summoned to Mumbai immediately
सेनेच्या चंद्रहार पाटलांना तातडीने मुंबईला पाचारण
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

लक्ष्मणमामा लहान असताना त्यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर हे ठाण्यात आले. त्यावेळी लक्ष्मणमामा ४ वर्षांचे होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील मुर्डेश्वर. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतूने आजचे तहसीलदार कार्यालय, म्हणजे त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाडे तत्त्वावर घेतली आणि तिथे कँटीन सुरू केलं. मात्र त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची जबाबदारी लक्ष्मण मुरडेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून समर्थपणे मिसळीचा हा व्यवसाय ते सांभाळत होते. त्यांच्या मिसळीच्या अनेक शाखा मुंबई, बोरिवली, डोंबिवलीत सुरु झाल्या आहेत.

खाकी रंगाच्या डिशमध्ये लालभडक तरीसोबत असलेली मिसळ, त्यावर पेरलेला कांदा, फरसाण आणि शेजारी काचेच्या बशीत दोन पाव. हे पाहून अस्सल खवय्यांना मिसळ खावीशी वाटली नाही तरच नवल. सर्वात तिखट मिसळ अशी या मिसळीची ख्याती आहे. मामलेदार मिसळ तीन प्रकारांमध्ये मिळते. कमी तिखट, मध्यम तिखट आणि खूप तिखट. यातली खूप तिखट मिसळ खाणं हे साध्यासुध्या माणसाचं काम नाही. पट्टीचा तिखट खाणाराच तिथे पाहिजे.

ठाणे स्टेशनजवळ असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयावर एका छोट्याश्या कँटिनमध्ये या मिसळीचा प्रवास सुरु झाला. ५० स्क्वेअर फुटांवरुन इथलं कँटिन ५०० स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त मोठ्या जागेत गेलं. मात्र या मिसळीची चव किंचितही बदलली नाही. इथे मिसळ खायला बसल्यावर तुमच्यासमोर पाण्याचे भरपूर ग्लास ठेवले जातात. नवख्या लोकांना एवढे ग्लास का ठेवले जात असतील हा प्रश्न पडतोच. मात्र मिसळीचा पहिला घास खाल्यानंतर कळतं की एवढं पाणी का आणून ठेवलं आहे. मामलेदार मिसळ सुरु करणाऱ्या नरसिंह मुर्डेश्वर यांच्या पत्नीने या मिसळीसाठीचा मसाला सर्वात आधी तयार केला होता. आजही त्याच पद्धतीचा मसाला वापरुन ही मिसळ तयार केली जाते. त्यामुळे मिसळीच्या चवीत थोडासाही फरक पडलेला नाही.