गौरी पूजनासाठी अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पत्रीचा बाजार फुलला

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट असले तरीही अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पारंपरिक गौरी सणासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती आणि पत्रींचा बाजार फुलला आहे. त्यामुळे करोनाच्या संकटात गेल्या चार महिन्यांपासून आपल्या हक्काच्या रोजगारापासून दूर गेलेल्या आदिवासींना गणेशोत्सवाच्या निमित्ताने या पत्री विक्रीतून नवी संजीवनी मिळाली आहे. यंदा सार्वजानिक वाहतूक बंद असल्यामुळे आदिवासींना पत्री विक्रीसाठी शहरात येण्यास अतिरिक्त वाहतूक खर्च करावा लागत असल्याने पत्रींच्या किमती वाढल्याचे दिसून येत आहे.

नागरिकीकरणात अंबरनाथ, बदलापूर शहराचे स्वरूप बदलत असले तरी येथील आगरी, कोळी आणि कोकणी संस्कृतीच्या सण-उत्सवांना आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशोत्सव आणि गौरीपूजन यातला सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची छाप या गौरीपूजनाच्या सणावर दिसून येतो. गौरीपूजनावेळी औषधी वनस्पती, फुले आणि पत्रींचे वेगळे महत्त्व आहे. गौरीपूजनासाठी बाजारांमध्ये अंबरनाथ, मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागांतून मोठय़ा संख्येने आदिवासी बदलापूर, अंबरनाथच्या बाजारपेठांमध्ये येतात. यात पिंपळ, रूई, धापा, धुणा, जाई, कन्हेर, अगस्ती, केवडा, दुर्वा, माका, तुळस, मालती, धोत्रास डोरली, देवदार अशा औषधी वनस्पती आणि विविध झाडांच्या पानांचा समावेश असतो. यात गौरीची फुले नावाने प्रसिद्ध असलेल्या फुलांनाही चांगली मागणी असते. अनेक जण आपल्या आवश्यकतेनुसार वनस्पती आणि फुले विकत घेतात. तर बहुतांश वेळा या सर्व वनस्पती आणि फुलांची जुडी दुडय़ांच्या पानांमध्ये एकत्रित बांधून विकली जाते. गौरीपूजनात शौभेसाठी घुंगराची काठी म्हणून असलेली आगळीवेगळी वनस्पतीही यानिमित्ताने बाजारात दाखल होत असते. हिरव्या काठीला घुंगराच्या आकाराची फळे लोंबकळत असल्याने याला घुंगराची काठी असे म्हणतात. यासह केळी, विडय़ाची पाने, जंगली आळूची पानेही पूजन आणि नैवेद्यासाठी वापरली जातात.

हरतालिका, गणेश चतुर्थी, गौरीपूजन आणि अनंत चतुर्दशीच्या पूजेसाठी या औषधी वनस्पती आणि पत्रींना मोठे महत्त्व आहे. त्यासाठी गौरीपूजनाच्या दोन दिवस आधीपासून अंबरनाथ आणि बदलापुरातील बाजारपेठा या आदिवासींनी फुलून गेल्या आहेत. सध्या बदलापूर आणि अंबरनाथमध्ये सुमारे अडीचशेहून अधिक आदिवासी महिला या पत्री विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

यंदा पत्री महागल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदाच्या गणेशोत्सवात फुलांच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाच गणेश आणि गौरीपूजनात आवश्यक असलेल्या पत्रींचे दरही आदिवासी महिलांनी वाढवले आहेत. यापूर्वी २० रुपयांपासून असलेल्या पत्री सध्या १०० ते १५० रुपयांना विकल्या जात आहेत. यंदा करोनामुळे सार्वजानिक वाहतुकीवर मर्यादा असल्यामुळे या आदिवासी महिलांना बाजारपेठेत येण्यासाठी मोठय़ा शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे दर वाढवल्याचे या आदिवासी महिलांकडून सांगण्यात आले आहे.