मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील घोडबंदर मार्गांवर असलेल्या चेना गावात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. अद्यापही बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसले तरी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दितीत घोडबंदर परिसराला लागून संजय गांधी राष्टीय उद्यान आहे. या उद्यानात अनेक वन्य प्राणी वास्तव्य करत आहेत. अनेक वेळा पाणी किंवा शिकार प्राप्त करण्याच्या हेतूने हे प्राणी शहराच्या दिशने येत असतात. त्यामुळे वन्य प्राणी आणि माणसांमध्ये संघर्ष होत असल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी दुपारच्या वेळेस घोडबंदर येथील चेना गावात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो राष्टीय उद्यानातील पशु रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा बिबट्या साधारण पाच वर्षाचा असून ५३ किलोचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राथमिक अहवालानुसार बिबट्याच्या छाती व पोटाच्या आतमध्ये मुका मार लागल्याने अंतर्गत रक्तप्रवाह होऊन मृत्यू झाला असल्याचे डॉ. शैलेश पेठे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. तर बिबट्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाला की दोन बिबटयामधील अंतर्गत वादामुळे झाला याचा तपास वन अधिकारी मनोज पाटील हे करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यापूर्वीच घोडबंदर येथे वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यात आता ही घटना घडल्यामुळे वर्षभरातच दोन बिबट्याचा मृत्यू होणे हे गंभीर असल्याचे मत वन्यप्राणी प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.