ठाण्यात घोडबंदर रोडवरील ओवळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबळ्यांचा संचार वाढल्याने तेथील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. गेल्या आठवडाभरात या बिबळ्यांनी दोन कुत्रे आणि एका मांजरीची शिकार केली असून बिबळ्याच्या भीतीने परिसरातील भटकी कुत्रीही गायब झाली आहेत. त्यामुळे सावजाच्या शोधात बिबळ्याने आता इमारतींच्या आवारात प्रवेश करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील रहिवासी सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास घाबरू लागले आहेत.
ठाण्यातील ओवळा गाव येथील गुप्ता यांच्या बंगल्यातील दोन कुत्री बिबळ्याने गेल्या आठवडय़ात उचलून नेली. विशेष म्हणजे, या बंगल्यातील सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन बिबळे आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात गाडय़ांच्या मागे लपलेले बिबळे हळूहळू बाहेर पडताना दिसून आले. तसेच बंगल्याच्या आवाराच्या भिंतीवर बिबळ्यांच्या पायांचे ठसेही आढळून आले. बिबळ्यांनी गुप्ता यांच्या पाळीव कुत्र्यासह आणखी एका कुत्र्याची शिकार केली असून या दोन्ही कुत्र्यांचे मृतावशेष बंगल्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावर आढळून आले.
ओवळा परिसर हा वनक्षेत्राच्या हद्दीला लागूनच असून या परिसरामध्ये पाळीव कुत्रे आणि भटके कुत्रेही आहेत. बिबळ्याला इतर प्राण्यांवर भक्ष्यासाठी अवलंबून राहण्यापेक्षा कुत्रे आणि पाळीव जनावरांची शिकार करणे सोपे जाते. त्यामुळे ते शहरात येतात, असे वनविभागाचे म्हणणे आहे. ‘कचरा वाढल्यास भटकी कुत्री वाढतात आणि त्यामुळे पर्यायाने बिबळे शहरात दाखल होतात. त्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पाळीव कुत्रे आणि प्राणी उघडय़ावर राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे आवाहन येऊर विभागातील वन अधिकाऱ्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard threat in thane
First published on: 13-08-2015 at 01:52 IST