उन्हाळय़ाची सुटी म्हणजे मुलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. दिवसभर हुंदडायला, बागडायला, खेळायला मिळणार असल्याने त्यांचा उत्साह टिपेला पोहोचलेला असतो. पण अनेकदा उन्हात त्रास होईल, किती खेळशील असे उपदेशाचे डोस पाजत पालक मुलांना घरीच बसायला भाग पाडतात. मग मुले कॉम्प्युटर गेम्स, व्हिडीओ गेम्स, मोबाइल यांकडे आकर्षित होतात आणि कालांतराने त्याच्या आहारी जाऊन मैदानी खेळच विसरतात. खरं तर मैदानी खेळ हे केवळ मुलांच्या मनोरंजनाचे नव्हे, तर आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे माध्यम आहे.
मुलांकडून होणाऱ्या अवास्तव अपेक्षांमुळे पालक वर्षभर मुलांना अभ्यासाच्या ओझ्याखाली ठेवतात. त्यामुळे अभ्यास एके अभ्यास असेच काहीसे वर्षभर वातावरण असते. मुले शाळा, क्लास, गृहपाठ या चक्रात पुरती अडकून राहतात. मग विरंगुळा म्हणून मोबाइल गेम्स, कॉम्युटरवरील गेम्स, व्हिडीओ गेम्स खेळतात. त्यामुळे मैदानी खेळ मुलं विसरली आहेत की काय, अशीच काहीशी परिस्थिती आहे. सध्या सगळीकडे परीक्षेचे वातावरण आहे. परंतु या परीक्षा संपल्यावर मुलांना लागणाऱ्या दोन महिन्यांच्या सुट्टीत पालकांपुढे यक्षप्रश्न निर्माण होतो- सुट्टीचा वेळ कसा घालवायचा? मग चौकशी सुरू होते ती विविध शिबिरांची. मग शिबिरांची निवड करतानाही मैदानी खेळांच्या शिबिरांचा विचार पालक फारसा करताना दिसत नाहीत, असे चित्र आहे. मग पुन्हा मोबाइल गेम्स, कॉम्युटरवरील गेम्स, व्हिडीओ गेम्स हे चक्र सुरू राहते. त्यात भर पडते ती टी.व्हीची. टी.व्ही.वरील कार्टून्सच्या मोहजालात मुलं पुरती अडकून जातात. परिणामी मुलं मैदानी खेळ आणि मुळात खेळणंच विसरली आहेत. अशा वेळी माझी त्या पालकांना कळकळीची विनंती आहे की त्या मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं; जेणेकरून  मैदानी खेळांतून मुलांचा सर्वागीण विकास होईल. सुदैवाने ठाणे शहरात अनेक नामवंत संस्था वर्षभर व मे महिन्यामध्ये खेळांविषयीचे खूप छान उपक्रम राबवीत आहेत.
मुलांनी मैदानात किंवा इनडोअर गेम्स खेळायला सुरुवात केली की, त्यांची स्मरणशक्ती, श्वसनक्षमता, रक्तसंचय वाढणे असे अनेक फायदे होतात आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांची एकाग्रता आणि भूक वाढते. या सर्व गोष्टी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी उपयुक्त ठरतात.
मी स्वत: एक क्रीडाशिक्षिका आहे. त्याप्रमाणे मी योगवर्गसुद्धा घेते. ठाण्यामध्ये सरस्वती क्रीडा संकुलामध्ये मे महिन्यात जिम्नॅस्टिक, ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, खोखो, बास्केटबॉल, ज्युदो यांची शिबिरं असतात. या संस्थेमधील खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. या संस्थेत मे महिन्यामध्ये १ मे ते १५ मे सकाळी ९ ते  सायंकाळी ५ दरम्यान एक आगळेवेगळे शिबीर घेतले जाते. तसेच २ मे ते २३ मेदरम्यान मैदानी खेळांचे शिबीर घेतले जाते. या शिबिरात मुलांना बटाटा शर्यत, कुस्ती, उभा खो खो, अडथळा शर्यत, लंगडी हे खेळ घेतो. त्यानंतर शेवटची दहा मिनिटं श्लोक व गाणी घेतली जातात.
ठाण्यामध्ये उमा निळकंठ व्यायामशाळा, शिवसमर्थ, पी.ई.एस्, वसंतविहार, मावळी मंडळ आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी अनेक उपयुक्त उपक्रम चालतात. ‘घंटाळी मित्र मंडळा’तर्फे उंचीवृद्धी शिबीर घेतले जाते. त्यामध्ये मुलांना वेगवेगळी आसने, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम शिकवले जातात. या शिबिरांमुळे मुलांना योगाचे महत्त्व कळते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत योगशास्त्र नक्कीच उपयुक्त ठरते आहे.
आजकाल आपल्याकडेही विभक्त कुटुंबपद्धती आहे. त्यात प्रत्येकाला एकच अपत्य. त्यामुळे पालकांच्या पाल्याकडून खूप अपेक्षा असतात. एकच मूल असल्याने त्याला आपल्या वस्तू दुसऱ्याला शेअर करायची सवय नसते. परंतु खेळांच्या शिबिरांमुळे त्याला सामाजिक जीवनात कसे जगायचे हे कळते. तेथे त्याला वेगवेगळे मित्र मिळतात आणि खेळांमधून खिलाडूवृत्तीचा विकास होतो. या खेळांच्या शिबिरांमुळे मुलांवर खेळाचे महत्त्व, त्यातील आनंद आणि त्याचे फायदे कळतात. एक क्रीडाशिक्षिका म्हणून माझी पालकांना कळकळीची विनंती आहे की मुलांना मुक्तहस्ताने त्याच्या सुट्टीचा मोबदला द्या. त्यांना मातीमध्ये खेळू द्या!
तृप्ती अंबुकर ,क्रीडाशिक्षिका, एम.ए., योगशास्त्र