ब्रेल लिपीतील पुस्तके, ध्वनिफितींची सुविधा; श्री गणेश मंदिर संस्थानचा उपक्रम
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अंध विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने त्यांच्या ग्रंथालयात अंधांसाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था केली आहे. त्यात ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध केली जाणार आहेत.
अंध व्यक्तींना एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास त्यांना भरपूर भटकंती करावी लागते. मुंबई किंवा ठाणे येथे काही मोक्याच्या ठिकाणी ब्रेल लिपीतील पुस्तके त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र त्याचा फायदा सर्वच अंध व्यक्तींना घेता येतो असे नाही. अंधांची ही गरज ओळखून श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने ग्रंथालयात अंधांसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला या विभागाचे उद्घाटन होणार आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी असलेले हे डोंबिवलीतील पहिलेच ग्रंथालय असल्याचा दावा संस्थानने केला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे आचार्य अत्रे ग्रंथालय श्री गणेश मंदिर संस्थानने सामाजिक भावनेतून चालवायला घेतले आहे. ७ एप्रिलला या ग्रंथालयाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या ग्रंथालयात अंधांसाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असल्याची माहिती संस्थानचे उपाध्यक्ष प्रवीण दुधे यांनी दिली. कल्याण, डोंबिवली, वाशी, पनवेल, नवी मुंबई, कर्जत, कसारा आदी भागात सुमारे १५०० अंध विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल असा विचार सुरूअसतानाच, त्यांच्यासाठी ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करावी अशी कल्पना सुचली. या ग्रंथालयाचा उपयोग अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून ते एम.ए. पर्यंतचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांला होणार आहे.
शैक्षणिक वर्षांतील सर्व पुस्तके ऑडिओ सीडीच्या रूपात ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहेत. काही विद्यार्थ्यांना त्या सीडी घरी नेऊन ऐकायच्या असतील तरी त्या नाममात्र शुल्कात उपलब्ध होतील. शैक्षणिक अभ्यासासोबतच काहींना इतर कोणती पुस्तके वाचनाची आवड असेल तर काही कादंबऱ्या श्राव्य स्वरूपात येथे ठेवल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा विभाग सध्या सुरूकरण्यात येणार असून मुलांचा प्रतिसाद पाहून त्याचा विस्तार केला जाईल. सर्वसामान्य मुले शालेय अभ्यासक्रमासाठी विशेष वर्ग लावतात किंवा एखाद्या अभ्यासिकेत प्रवेश घेतात. अंधांसाठी असे कोणतेही विशेष वर्ग किंवा अभ्यासिका नाहीत. शाळेत त्यांचा जेवढा अभ्यास होईल तेवढेच. परंतु विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाची पुस्तके त्याविषयी विशेष मार्गदर्शनपर सीडी येथे उपलब्ध असतील.
अंधांसाठी मुंबई किंवा ठाणे येथे ग्रंथालयासारख्या सुविधा महाविद्यालय तसेच खासगी संस्थांमार्फत सुरूआहेत. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे अंधत्वाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते. मात्र अनेक अंध व्यक्तींकडे तसे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे ते अशा सुविधांपासून वंचित राहतात. त्यांनाही या ग्रंथदालनाचा लाभ घेता येईल, असे दुधे यांनी सांगितले.