डोंबिवलीतील श्री गणेश मंदिरातील अभ्यासिकेत नियमित ५० ते ६० विद्यार्थी अभ्यासाला यायचे. आता परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने विद्यार्थ्यांची संख्या १५० वर पोहोचली आहे. यात बहुतांशी विद्यार्थी उच्च शिक्षणाचा अभ्यास करणारे आहेत.
गणेश मंदिरात पहिल्या माळ्यावर साठ विद्यार्थ्यांच्या आसनक्षमतेची अभ्यासिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही अभ्यासिका सुरू आहे. गणपती मंदिराच्या नवीन वास्तूमुळे या अभ्यासिकेला नवीन रूप देण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यासिकेत नियमित विविध स्तर, गटातील मुले-मुली येतात. परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांची संख्या थेट दीडशेवर पोहोचते, असे मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले.
या ठिकाणी आल्यानंतर शांत वातावरणात मन एकाग्र करून अभ्यास करता येतो.                             
घरात भ्रमणध्वनी, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा अडथळा असतो. त्यातही घरातील मंडळींची ऊठबस असते. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यामुळे मंदिरातील अभ्यासिकेत आले की पहिले प्रसन्न वाटते आणि चांगला अभ्यास होतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थी संख्या वाढल्याने मंदिरातील अन्य सभागृह विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात येतात. अभ्यासिकेत येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीची नोंदणी केली जाते. त्यांच्या सेवेसाठी मंदिरातर्फे एक साहाय्यक ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मोबाइल, लॅपटॉप चार्ज करण्यासाठी विजेची व्यवस्था, पाणी व्यवस्था केली जाते. इतर वेळी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत अभ्यासिका उघडी असते. परीक्षेच्या काळात सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येते. सनदी लेखापाल, कंपनी सचिव, वकील, अभियंता अशा उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वाधिक संख्येने येत असल्याचे दुधे यांनी सांगितले.