पॅपिलीओ डिमोलस हे फुलपाखरू जास्त परिचित आहे, ते सिट्रस बटरफ्लाय (Citrus butterfly) किंवा लाईम बटरफ्लाय म्हणूनच. फुलपाखरांना दिली गेलेली नावे त्यांच्याबद्दल बरंच काही सांगतात. आता या फुलपाखराचेच बघा ना. ही फुलपाखरं लिंबूवर्गीय झाडांवर अंडी घालतात आणि या फुलपाखरांच्या अळ्या मात्र झाडांची पानं खातात.
लिंबूवर्गीय झाडांमध्ये लिंबू, संत्री, मोसंबी, पपनस, बेल इत्यादी झाडे येतात. या मादीवर नजर टाकली तर असं दिसतं की ही सर्व झाडे मुद्दाम लावली जातात. शेतांमध्ये, फळबागांमध्ये ही झाडे लावून पीक घेतले जातेच; शिवाय खेडय़ांमध्ये आणि अगदी शहरांमध्येही परसबागांत ही झाडे मुद्दाम लावली जातात आणि म्हणूनच लाईम बटरफ्लाय आपल्याला अगदी सगळीकडेच पाहायला मिळतात. त्या अर्थी हे एक कॉमन फुलपाखरू आहे.
या फुलपाखरांच्या पंखांवरील काळ्या रंगावर पिवळे ठिपके असतात. हे फिक्कट पिवळे ठिपके संपूर्ण पंखावर पसरलेले असतात. वयस्क फुलपाखरांमध्ये हे पिवळे ठिपके नारिंगी रंगाचे होत जातात. ‘स्व्ॉलोटेल’ फुलपाखरांमध्ये फुलपाखरांच्या पंखांच्या शेवटी शेपटीसारखा निमुळता होत गेलेला एक भाग असतो. लाईम बटरफ्लाय जरी याच कुळात मोडत असलं तरी त्याला ही शेपटी नसते. लाईम बटरफ्लायच्या अंडी, अळी, कोष आणि फुलपाखरू या चारही अवस्था पूर्ण होण्यासाठी साधारणत: दोन महिने लागतात. म्हणजेच एका वर्षांत या फुलपाखरांच्या साधारणपणे सहा पिढय़ा जन्माला येतात. पण गमतीचा भाग म्हणजे उष्ण प्रदेशामध्ये या फुलपाखरांच्या एका वर्षांत नऊ पिढय़ा होतात तर थंड प्रदेशात जास्तीत जास्त पाच पिढय़ा जन्मतात. म्हणजेच फुलपाखरांचा जीवनक्रम उष्णतामानावर अवलंबून असतो.
अंडय़ांमधून बाहेर पडणारी अळी काळसर रंगाची असून पक्षाच्या विष्ठेमध्ये मुरिक अ‍ॅसिड (muric acid ) च्या ठिपक्यासारखे पांढरे डाग असतात. ही अळी पानाच्या वर अगदी उघडय़ावर बसते. कारण ती पक्ष्याची विष्ठाच असते. परंतु अळी/सुरवंट मोठा होत गेला की मात्र त्याचा रंग बदलतो आणि पानासारखाच हिरवा बनतो.
या सुरवंटांना अनेक शत्रू असतात. त्यातील महत्त्वाचा शत्रू म्हणजे एक प्रकारची गांधीलमाशी; जी या सुरवंटाच्या शरीरात अंडी घालते. या अंडय़ांमधून बाहेर आलेल्या अळ्या लाईम बटरफ्लायच्या सुरवंटाच्या मांसावर जगतात आणि मोठे होतात. ‘लाईम बटरफ्लाय’ फुलांमधील मध आणि चिखलातील पाणी शोषून घेताना नेहमी आढळतात. त्यांचं उडणं हे जमिनीवरच आणि आपले दोन्ही पंख पूर्ण पसरून/ उघडे ठेवून असते. जगाच्या बऱ्याच मोठय़ा भागांमध्ये लाईम बटरफ्लाय आढळून येते. या सर्व ठिकाणी पिकांवरची लिंबूवर्गीय (फळझाडांच्या) एक मोठी कीड म्हणूनच या फुलपाखराला अलीकडे पाहिले जाते. या फुलपाखराचा प्रसार आणि संचार जगामधील वेगवेगळ्या भागांमध्ये फार झपाटय़ाने होताना पाहायला मिळतो.