अपघात, छेडछाड रोखण्यासाठी रिसॉर्ट संघटनांचा निर्णय

या उन्हाळ्याच्या सुट्टीत वसईच्या रिसॉर्टमध्ये जाऊन मद्यधुंद होण्याचा यापुढे विचारही करू नका कारण वसईतील सर्व रिसॉर्ट संघटनांनी मद्यविक्री तसेच मद्यपानास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या मद्यबंदीची अंमलबाजवणी येत्या शनिवारपासून केली जाणार आहे. रिसॉर्टमधील वाढत्या दुर्घटना, छेडछाड आणि बीभत्स प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.

वसईच्या पश्चिमेला नयनरम्य समुद्रकिनारा आहे. त्यामुळे तेथे अनेक रिसॉर्ट्स आहेत. तरणतलाव, वॉटर स्पोर्ट्स, रेन डान्स आदी सुविधा या रिसॉर्टमध्ये आहेत. सुमारे ४० हून अधिक लहान-मोठे रिसॉर्ट वसई, नालासोपारा आणि विरारच्या किनारपट्टीवर आहेत. केवळ दोनच रिसॉर्टना मद्यविक्रीचे परवाने मिळालेले होते. उरलेल्या रिसॉर्टमध्ये बेकायदा मद्यविक्री केली जात होती. तसेच बाहेरूनही अनेकदा मद्य आणले जात होते. मद्यपानामुळे अनेक दुर्घटना, छेडछाडीच्या घटना, बीभत्स प्रकार घडत होते. मागील आठवडय़ात अर्नाळा येथील एका रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. रिसॉर्टच्या तरणतलावात बुडून मरण पावणाऱ्या बहुतांश जणांनी मद्यप्राशन केल्याचे रिसॉर्टचालकांचे म्हणणे आहे. याशिवाय मद्यपींच्या गटामुळे इतर कौटुंबिक सहलीसाठी आलेल्यांना त्रास होत असतो. अनेकदा मद्यपींकडून विनयभंगाच्या घटनाही घडतात. यामुळे रिसॉर्टचीही बदनामी होते. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी रिसॉर्ट चालकांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत कायमस्वरूपी मद्यबंदीचा निर्णय घेण्यात आला.

महसुलावर परिणाम होणार नाही

रिसॉर्टमधील दारूबंदीमुळे रिसॉर्टचालकांचा महसूल बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण रिसॉर्टचालकांना असे होण्याची शक्यता वाटत नाही. रिसॉर्टमध्ये दारूबंदी झाल्यावर कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढेल. तसेच मद्यप्राशन करणारे पर्यटक बाहेरची दारू आणत असल्याने तशीही रिसॉर्टच्या महसुलात भर पडत नव्हतीच त्यामुळे याचा महसुलावर थेट परिणाम होणार नाही, असे रिसॉर्ट चालकांचे म्हणने आहे.

केवळ दोनच रिसॉर्ट्सना मद्यविक्री किंवा पर्यटकांसाठी मद्यप्राशन करण्यास परवानगी आहे. आमचे भरारी पथक त्यासाठी कार्यरत आहे. हा नर्णय जरी चांगला असला तरी आमच्याकडे परमिटसाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

नंदकुमार मोरे, पोलिस निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विरार विभाग

मौजमस्ती करण्यासाठी पर्यटक मद्यप्राशन करतात. त्यामुळे अनेक अनुचित प्रकार घडतात. पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊनही ते मद्यप्राशन करून तरण तलावात उतरल्याने दुर्घटना घडतात. काही पर्यटक जीवरक्षकांनाही जुमानत नाहीत.  आमचा या निर्णयाला पाठिंबा आहे.

रामदास मेहेर, अध्यक्ष, नवापूर कळंब रिसॉर्ट संघटना

आम्ही पूर्वीपासूनच मद्य्विक्री किंवा मद्यप्राशन करू देत नाही. परंतु याच वेळी समुद्रकिनाऱ्यात मद्यप्राशन करून जाणाऱ्यांनाही लगाम घालणे आवश्यक आहे.

डॉ. नितीन थोरवे, मालक, अर्नाळा बीच रिसॉर्ट