‘घन बरसे’वर टीकेचा वर्षांव!

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे वसई-विरार शहर पाण्यात गेले होते.

महापालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून ‘घन बरसे’ हा पाऊसगीतांचा कार्यक्रम आयोजित करीत असल्याने पालिकेवर सर्व स्तरांतून टीकेचा वर्षांव होत आहे.

पूरग्रस्त वसईत पाऊसगीतांचा कार्यक्रम करण्यास साहित्यिकांचाच विरोध; कार्यक्रमस्थळी आंदोलनाचा इशारा

वसई : वसई-विरार शहर पुरात उद्ध्वस्त झाले असताना महापालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून ‘घन बरसे’ हा पाऊसगीतांचा कार्यक्रम आयोजित करीत असल्याने पालिकेवर सर्व स्तरांतून टीकेचा वर्षांव होत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याचे सोडून महापालिका असंवेदनशील बनली आहे, अशी टीका सर्वच साहित्यिकांनी केली आहे. कार्यक्रमस्थळी येऊन निदर्शने करणार असल्याचे साहित्यिकांनी जाहीर केले आहे.

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे वसई-विरार शहर पाण्यात गेले होते. तब्बल सहा दिवस शहरातील पाणी ओसरले नव्हते. वीज गायब, वाहतूक व्यवस्था विस्कळीत, संपर्क यंत्रणेचा बोऱ्या, बाजारपेठा बंद अशा अवस्थेत वसईकरांनी दिवस काढले. शहराची अशी अवस्था झाली असताना महापालिकेने ५ ऑगस्ट रोजी पाऊसगीतांचा ‘घन बरसे’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. माणिकपूरच्या वायएमसीए सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. शहराची दुरवस्था झाली असताना महापालिकेने हा कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वसामान्य नागरिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी तीव्र विरोध करून महापालिकेच्या असंवेदनशीलतेवर आसूड ओढले. प्रसिद्ध कवी

सायमन मार्टिन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पालिकेला लाज उरली आहे की नाही, असा सवाल केला.

‘शब्दवेल साहित्या’च्या अध्यक्षा पल्लवी बनसोडे यांनीही हा कार्यक्रम व्हायला नको, असे मत व्यक्त केले. जो खर्च पाऊस गाण्यांवर करता तो पूरग्रस्तांवर करा, असे त्या म्हणाल्या. पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसिद्ध साहित्यिक आणि धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनीही महापालिकेवर टीकास्त्र सोडले. वसईकरांवर संकट आले होते, अनेकांचे अकाली बळी गेले. पालिकेला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. माणुसकी हा वसईकरांचा धर्म आहे. त्याचे पालन का केले जात नाही, असे ते म्हणाले. एका हिंदी शायरचा दाखला देत, घराशेजारी प्रेत असताना हा आंनदोत्सव साजरा केला जात असेल तर तो मला मान्य नाही, असे ते म्हणाले.

आम्ही कार्यक्रमाला कुठल्या रस्त्याने येऊ आणि कार्यक्रम संपल्यावर सुरक्षित परत जाऊ का, असा उद्विग्न सवाल वसईतील प्रख्यात साहित्यिकेने केला आहे. वसईची जागोजागी वाताहत झाली आहे, अशा वेळी पाऊसगीतांचा कार्यक्रम महापालिका करूच कसा शकते, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

वसई-विरार महापालिका असंवेदनशील बनली आहे. शहरात सहा बळी गेले, अनेकांना पाण्याने वेढले होते. अशा लोकांबद्दल सहानुभूती बाळगणे ही माणुसकी आहे. पालिकेने कार्यक्रम रद्द करून माणुसकीचा आदर्श घालून द्यायला हवा.

– फा. फ्रान्सिस दिब्रिटो, साहित्यिक

मी एक वसईकर म्हणून या कार्यक्रमस्थळी येऊन निषेध करणार आहे. पालिका प्रशासन राबवणारे कोडगे बनले आहेत. तुम्ही पावसाची गीते गा, मी तुमचा निषेध करतो.

– सायमन मार्टिन, कवी

वसईवर शोककळा असताना हा आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण काय? हा कार्यक्रम दरवर्षीचा असला तरी तो यंदा आवश्यकच होता असे नाही. पूरग्रस्तांबाबत संवेदना म्हणून तो एक वर्ष केला नसता तर चालले असते. ज्यांच्या घरात पुराचे पाणी तीन दिवस होते, त्यांना यातना देण्याचा हा प्रकार आहे.

– हृषीकेश वैद्य, अध्यक्ष, आमची वसई संस्था

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Literary protest against rain show in flood hit vasai