रेल्वेची कचरा गाडी

भारतीयांची एक खासियत आहे. किंबहुना हा जगभरातला मानवी स्वभाव असावा.

आपण मुंबईकर दर दिवशी लोकलने प्रवास करताना नाना तऱ्हेचा कचरा गाडीच्या खिडकीतून, दरवाजातून किंवा अगदी प्लॅटफॉर्मवरूनही रुळांवर टाकतो. रेल्वेमार्गाच्या बाजूला असलेल्या वस्त्यांमधूनही भरमसाट कचरा रुळांवर पडतो. मग काय होतं या कचऱ्याचं..

भारतीयांची एक खासियत आहे. किंबहुना हा जगभरातला मानवी स्वभाव असावा. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट करायची नाही, असं बजावून सांगितल्यावर नेमकी तीच गोष्ट त्याच ठिकाणी करण्याची हुक्की येते. राहवत नाही म्हणा किंवा इतर काही. उदाहरणार्थ, ‘स्टेशन आपली संपत्ती आहे. ते स्वच्छ ठेवण्यासाठी रेल्वेला सहकार्य करा’ असं रेल्वेच्या कण्र्यातली ती बाई बोंबलून बोंबलून सांगत असते. पण ते आपल्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचतच नाही आणि आपण बिनदिक्कत वेफर्सच्या पिशव्या, चॉकलेटचे रॅपर, गेला बाजार प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अगदीच काही नाही, तर तंबाखूची सणसणीत पिक बिनधास्त प्लॅटफॉर्मवरून उभ्या उभ्या रुळांवर टाकतो.

बरं, प्लॅटफॉर्मवर उभं राहूनच हे कारनामे आपल्याला सुचतात असं नाही. गाडीत खाण्यासाठी भेळ, वेफर्स वगरे घेतले की, ते खाऊन झाल्यावर वेष्टन तसंच खिडकीबाहेर टाकायची हुक्की येते. ते जपून ठेवून गाडीतून उतरल्यावर प्लॅटफॉर्मवरील एखाद्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचा ‘बुरसटलेला’ विचार आपल्या डोक्यात कधीच येत नाही. रेल्वेमार्गाच्या बाजूला राहणाऱ्या वस्त्यांमधील लोकांना तर कचऱ्याचा डबा विकत घेणं परवडतच नसावं. किंवा घेतला तरी, त्यातला कचरा हक्काने फेकण्याची क्षेपणभूमी म्हणजे रेल्वेमार्ग, असंच त्यांना शालेय शिक्षणात शिकवलं असावं. कारण या वस्त्यांमधून प्लॅस्टिकच्या पिशव्या, जुने कपडे, सॅनिटरी नॅपकीन्स, रबरी चपला अशा वाट्टेल त्या गोष्टी रुळांवर दर दिवशी पडत असतात.

आता तुम्ही म्हणाल, ‘या गोष्टी दर दिवशी पडतात, मग जातात कुठे? कोणाची एवढी िहमत आहे त्या साफ करायची?’ ती हमत रेल्वेला करावी लागते. रेल्वेमार्गामध्ये येऊन पडणाऱ्या या कचऱ्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत रेल्वेला अनेक ठिकाणी ताशी ३० किलोमीटरच्या वेगमर्यादा लावाव्या लागल्या आहेत, हे प्रवाशांच्या गावीच नसतं. केवळ गाडय़ा नेहमीसारख्या वेगात धावत नाहीत, याचा राग हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर काढून तिचा बोळा करून तो खिडकीतून फेकून देत रेल्वेच्या नावाने शिवी हासडतो.

तर, रेल्वेमार्गावर पडलेला हा कचरा रेल्वेलाच साफ करावा लागतो. त्यासाठी पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गावर स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या कंत्राटदारांची माणसं टोळ्याटोळ्यांमध्ये रेल्वेमार्गावर फिरतात. ती कुठे फिरणार आहेत किंवा कोणत्या ठिकाणचा कचरा साफ करणार आहेत, याचं वेळापत्रकही रेल्वे अधिकाऱ्यांना आणि रेल्वेच्या विविध विभागांना कळवलं जातं. त्यानुसार त्या ठरावीक भागात गाडय़ांना वेगमर्यादा लागू केली जाते. कंत्राटदारांची ही माणसं दिवसा ट्रॅकमध्ये फिरतात. त्यांच्या हातात असलेल्या पंजासारख्या लोखंडी अवजाराने रुळांमधल्या खडीत अडकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, रुळांभोवती पडलेला कचरा आणि रुळांखाली आलेली माती आणि त्यामुळे झालेला चिखल एकत्र करून तो प्लॅस्टिकच्या गोणींमध्ये भरून ठेवतात. या गोणी ठरावीक अंतरावर रुळांच्या बाजूला ठेवल्या जातात. हे काम खूप जिकिरीचे आहे. कारण ते करताना दर चार-पाच मिनिटांनी बाजूने जाणाऱ्या लोकलवर नजर ठेवावी लागते. लोकल जाताना या कामगारांना अंग चोरून बाजूला उभं राहावं लागतं. अनेकदा आपल्यासारखेच खिडकीत बसलेले प्रवासी अनावर झालेली तंबाखूची पक किंवा हातांना जड झालेली प्लॅस्टिकची रिकामी पिशवी वा बाटली बिनदिक्कत रुळांवर फेकतात. ती नेमकी अशा काही कामगारांच्या अंगावरही पडते. एका माणसाने दुसऱ्यावर नकळत का होईना थुंकणं, याउपर अवहेलना कोणती!

पण ती अवहेलना नेहमीचीच झालेले हे कामगार आपलं काम उन्हातान्हात चोख करत असतात. एखाद्या सेक्शनमध्ये हे काम आठवडा आठवडा चालतं. मग दर रात्री दिवसभर गोळा केलेला कचरा एकत्र करण्यासाठी रेल्वेची कचरागाडी बाहेर पडते. प्रत्येक डब्यात काही पोती भरलेली एक जुनाट गाडी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडजवळ अनेकांनी पाहिली असेल. हीच ती रेल्वेची कचरा गाडी! रेल्वेच्या परिभाषेत या गाडीला ‘मक ट्रेन’ किंवा ‘मक स्पेशल’ म्हणतात. ज्या सेक्शनमध्ये कचरा गोळा करायचा आहे, त्या सेक्शनमधल्या एका स्टेशनवर कंत्राटदाराचे कामगार या कचरा गाडीची वाट पाहत थांबतात. ही गाडी या कामगारांना घेऊन कचरा गोळा केल्याच्या ठिकाणी जाते. तिथे मग हे कामगार ऐन रात्री खाली उतरून या गोणी गाडीमध्ये भरतात. त्या-त्या सेक्शनमधला कचरा गोळा होईपर्यंत ही गाडी अशा फेऱ्या मारते.

साधारण आठवडाभराचा कचरा गोळा झाला की, मग एक रात्री ‘मक डिस्पोझल’साठी ही गाडी बाहेर पडते. मध्य रेल्वेवरील हा कचरा दिवा-कोपर या स्थानकांमध्ये खाडीच्या भागात, वाशी खाडीजवळ, कल्याणच्या खाडी भागात टाकला जातो. तर पश्चिम रेल्वेवर वसईच्या खाडीजवळील पूल, भाईंदरजवळील पूल, वांद्रे खाडीजवळील पूल अशी ठिकाणे निवडण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे रेल्वेमार्गाखालील जमीन धसायची शक्यता असते, अशा ठिकाणी रेल्वेतला हा कचरा टाकला जातो. त्या रात्री पुन्हा कंत्रादाराची माणसे गाडीत बसतात. गोणींनी भरलेली ही गाडी रात्रीच्या वेळी रिकामी करणं, हे मोठं अवघड काम असतं. त्यासाठी एका डब्यात चार ते पाच असे सहा डब्यांमध्ये जेमतेम तीस कामगार असतात. गाडी वाशी खाडीवरील पुलावर येऊन थांबते. आसपास काळोख असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडत असल्यास कामगारांच्या अडचणीत भर पडते. बाजूलाच असलेल्या महामार्गावरील वाहनांचा अस्पष्ट आवाज कानांवर पडत असतो. खाडीजवळचा भाग असल्याने भरमसाट डास यथेच्छ चावत असतात. पण हे कामगार आपलं काम झपाटय़ाने उरकतात. थोडा कचरा रेल्वेमार्गाच्या बाजूला भराव म्हणून टाकल्यावर गाडी थोडी पुढे सरकते. पुन्हा त्या ठिकाणी कचऱ्याच्या गोणी पडतात. साधारण दीड-दोन तास हे काम चालतं.

प्रत्येक आठवडय़ाला रेल्वेची ही मक स्पेशल प्रति गाडी किमान एक टन कचरा घेऊन अशाच एखाद्या सखल जागी येऊन थांबते. रात्रीच्या अंधारात कंत्राटदाराची माणसं कचरा रुळांलगतच्या दलदलीत फेकतात. त्याचा पर्यावरणावर नक्कीच विपरीत परिणाम होत असेल, पण रेल्वेकडेही दुसरा पर्याय नसल्याने आणि मुंबईतील आपल्यासारखे लाखो प्रवासी कचरा फेकणं थांबवत नसल्याने रेल्वेची ही कचरा गाडी आपली अनिवार्य चक्कर मारत असते.

 

– रोहन टिल्लू

rohan.tillu@expressindia.com

Twitter @rohantillu

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Litter and garbage on the rail tracks