वसईतील शेतकरी संपात सहभागी नाही
राज्यभरातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचा फटका पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्याला तुरळक प्रमाणात बसला. नाशिकमधून येणारी भाज्यांची आवक कमी झाली असली तरी स्थानिक शेतकऱ्यांकडून पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांची मागणी वाढली आहे. या भाज्यांचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचेही दिसून आले आहे.
विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले. त्याचा फटका गुरुवारी पहिल्या दिवशी बसला नाही, मात्र शुक्रवारी अनेक ठिकाणी भाज्यांची आवक न आल्याने त्यांचा मोठा फटका ग्राहकांना बसला आहे. मात्र वसई-विरारमधील बाजारपेठांवर त्याचा तितकासा परिणाम झालेला नाही. वसईतील भाज्यांची बाजारपेठा नेहमीप्रमाणेच सुरू होत्या. स्थानिक शेतकरी संपावर न गेल्याने त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला.
वसई-विरारला टोमॅटो, कोबी, शिमला मिरची, वाटाणा, काकडी या भाज्यांचा नाशिकहून पुरवठा होतो. संपामुळे नाशिकहून शेतमाल न आल्याने या भाज्यांची आवक शुक्रवारी वसईच्या बाजारपेठांमध्ये नेहमीपेक्षा कमी प्रमाणात होती. त्यामुळे त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. वसई तालुक्यातील शेतकरी भाजीपाला पिकवण्यात प्रगत आहेत. भेंडी, गवार, पालक, मेथी, तांदुळका, कोरला, गलके, शिराळे, शेवग्याच्या शेंगा, दुधी, कारले, वांगी या सर्व भाज्या आगाशी, अर्नाळा, निर्मळ, कळंब, वसई या पश्चिम पट्टय़ात पिकवल्या जातात. या सर्व स्थानिक भाज्या वसईच्या मुख्य बाजारात म्हणजेच निर्मळ, वसई गाव, सोपारा, स्थानक परिसर येथे शुक्रवारी जास्त प्रमाणात दिसून आल्या. एवढेच नव्हे तर या सर्व भाज्या ताज्या असल्याने येथील स्थानिक शेतमालाला मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे शेतकरी रवींद्र पाटील यांनी सांगितले. मागणी वाढल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी स्थानिक भाज्यांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ केल्याचे राकेश म्हात्रे यांनी सांगितले.
मुंबईकर भाजी खरेदीसाठी वसईला
शेतकऱ्यांच्या संपामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्याचा फटका मुंबईकरांना बसला. मात्र वसईकर शेतकरी संपात सहभागी न झाल्याने आणि तिथे मुबलक भाजीपाला असल्याने मुंबईकरांनी आपला मोर्चा वसईकडे वळवला. भाजी खरेदीसाठी मुंबईकर वसई-विरारच्या बाजारपेठांमध्ये आल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. एवढेच नाही तर आठवडय़ाला पुरेल इतकी भाजी घेऊन जाताना ग्राहक दिसत होते, असेही त्यांनी सांगितले.